अजित पारसेंचा अनोखा संकल्प : हजारो नागरिकांना नि:शुल्क संगणक-इंटरनेटचे प्रशिक्षण योगेश पांडे नागपूर आधुनिकतेची कास धरून संगणकतज्ज्ञ म्हणून स्वत:ची प्रस्थापित केलेली वेगळी ओळख...आर्थिक मिळकत व कामाचा आवाका वाढविण्याच्या अनेक संधी. परंतु असे असतानादेखील आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या विचारांना दिलेले अग्रस्थान. यातूनच मनाचा संकल्प झाला अन् मजूर, गोरगरीब, वंचितांना ‘ई’ साक्षर करण्याच्या प्रवासाची सुरुवात झाली. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात राहूनदेखील सामाजिक तळमळीची जाणीव जपणाऱ्या अजित पारसे या संगणकतज्ज्ञाने स्वत:च्या कामाने समाजासमोर व विशेषत: तरुणांसमोर आदर्श निर्माण केला आहे. दैनंदिन व्यवहारात तंत्रज्ञानाचे प्रमाण वाढत आहे. अनेक बाबी या ‘आॅनलाईन’ प्रणालीमुळे सोप्या झाल्या आहेत. परंतु या प्रणालीची माहिती नसल्याने विविध शासकीय कामांसाठी नागरिकांना कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात. हीच बाब लक्षात घेऊन अजित पारसे हे शहरातील विविध स्तरांतील नागरिकांना प्रशिक्षण देत असतात. तंत्रज्ञानाचे विविध उपयोग आणि त्याचे फायदे यांची माहिती कष्टकरी, वंचितांना देण्यासाठी अजित पारसे सातत्याने प्रयत्नरत असतात. यासाठी ते स्वत: दररोज शहरातील कुठल्या ना कुठल्या झोपडीपट्टी, मजूर ठिय्या, महिला बचत गट, सामाजिक संस्था, अनाथालय, दिव्यांग संस्था इत्यादी ठिकाणी जाऊन संगणक व इंटरनेटबाबत नि:शुल्क मार्गदर्शन करतात. इंटरनेटचा प्रभावी माध्यम म्हणून वापर करत शासकीय योजना कशा समजावून घेतल्या जाऊ शकतात व त्यांचा लाभ कसा घेतल्या जाऊ शकतो, यावरदेखील ते प्रामुख्याने शिबिरांदरम्यान प्रकाश टाकतात. विशेष म्हणजे स्वत:चे काम सांभाळून ते दररोज शिबिर घेतात. रस्त्याने जातानादेखील मदत दररोज नागरिकांना ‘ई’ तंत्रज्ञानाबाबत माहिती देणे याचा अजित पारसे यांनी संकल्प घेतलाच आहे. एखादवेळी काही कारणांमुळे नियोजित शिबिर होऊ शकत नाही. अनेकदा कष्टकऱ्यांचे काम येते व अशा स्थितीत त्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी शिबिर पुढे ढकलावे लागते. परंतु रस्त्याने जाताना कष्टकऱ्यांचा वर्ग दिसला किंवा भाजीविक्रेते, आॅटोचालक, पानठेलेचालक, मजूर रिकामे दिसले तर त्यांना माहिती देण्यास सुरुवात करतात. यासाठी ते कुठेही जाताना स्वत:चा ‘लॅपटॉप’ जवळच ठेवतात. लघुउद्योग, बचतगटांना फायदा जगभरात ‘आॅनलाईन’ खरेदीचे प्रमाण वाढीस लागले आहे. अजित पारसे यांनी लघुउद्योग करणारे, कलाकुसरीचे काम करणारे, विविध बचतगट येथे जाऊन ‘आॅनलाईन’ बाजारपेठेबाबत मार्गदर्शन केले. विविध संकेतस्थळांचा उपयोग करून आपला माल कसा विकावा याचे प्रशिक्षण दिले. याचा फायदा अनेकांना झाला.
कष्टकऱ्यांच्या ‘ई’ साक्षरतेसाठी झटणारा ‘टेक्नोक्रॅट’
By admin | Published: July 22, 2016 2:51 AM