लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सद्यस्थितीत शहरी नक्षलवाद हा देशाच्या अंतर्गत सुरक्षेला असलेला सर्वात मोठा धोका मानण्यात येत आहे. देशातील एकात्मदर्शनवादाची मूळ विचारधारा बदलण्यासाठी या लोकांचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी तरुणाईचे ‘ब्रेनवॉश’ करण्यावर त्यांचा भर आहे. या बौद्धिक लढाईचा समाजाने एकत्रित होऊन सामना करण्याची आवश्यकता आहे, असे मत राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का यांनी व्यक्त केले. राष्ट्रसेविका समितीचा विजयादशमी व शस्त्रपूजन सोहळा रविवारी सायंकाळी संपन्न झाला. यावेळी त्या बोलत होत्या.माधवनगर येथील मैदानावर झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार विजेती भारोत्तोलनपटू मीराबाई चानू ही होती. शहरी नक्षलवाद हा केवळ देशासाठीच नव्हे तर आपल्या मूळ विचारधारेसाठी मोठा धोका आहे. तरुणांना चुकीच्या मार्गावर नेण्याचे कार्य ते लोक करत आहेत. या लोकांना सामान्यातून असामान्यत्व मिळविलेल्या लोकांच्या प्रेरणेतून उत्तर देता येईल. यासाठी सकारात्मक वातावरणनिर्मिती होणे आवश्यक आहे. यासाठी लहानपणापासूनच तसे संस्कार देणे आवश्यक आहे. प्रत्येकाने जागरूक नागरिक झाले पाहिजे व यात महिलांची मोठी भूमिका आहे, असे शांताक्का म्हणाल्या. आपल्या देशातील मुलींमध्ये प्रचंड क्षमता आहे. स्वत:ला सिद्ध करण्याचा त्यांच्यात विश्वास आहे. मात्र त्यांना कुटुंबामधून तसे सहकार्य व प्रोत्साहन मिळाले पाहिजे असे मत यावेळी मीराबाई चानूने व्यक्त केले.राष्ट्रसेविका समितीच्या विजयादशमीच्या सोहळ््याला नागपुरातील निरनिराळ््या शाखांमधील सेविकांची उपस्थिती होती.शाळकरी मुलींपासून ते वयस्कर महिलांपर्यंतचा समावेश असलेल्या सेविकांच्या पथकाने योगासने, घोष, लेझिम यांची निरनिराळी प्रात्यक्षिके सादर केली. त्याचबरोबर सेविकांनी दाखविलेल्या दंडाच्या प्रात्यक्षिकांनी तर उपस्थितांच्या नजरेचे पारणे फेडले. या कार्यक्रमाला समितीच्या माजी प्रमुख संचालिका प्रमिलताई मेढे, महापौर नंदा जिचकार महानगर कार्यवाहिका करुणा साठे या उपस्थित होत्या.
मानवाधिकार संघटनांवर टीकास्त्रशहरी नक्षलवादामध्ये गुंतलेल्या प्राध्यापकांना अटक झाल्यानंतर अनेक जण त्यांच्या समर्थनार्थ समोर आले. या लोकांनी काय योग्य, अयोग्य याचा सारासार विचार करायला हवा. मानवाधिकार संघटनांना तर देशाच्या विरोधात कार्य करणाऱ्यांचा पुळका आला होता. मात्र याच संघटनांना बंगालमध्ये उर्दू शिक्षणाच्या नावाखाली बंगाली बांधवांवर होणारा अन्याय दिसत नाही का, असा प्रश्न शांताक्का यांनी उपस्थित केला.
बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श घ्यावाआजच्या काळात प्रत्येकाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श घेण्याची गरज आहे. बाबासाहेबांनी नेहमी राष्ट्रीय दृष्टीने विचार केला व देशाला सर्वात जास्त प्राधान्य दिले. त्यांनी जो संकल्प केला, त्याच्यासाठी त्यांनी सर्वस्व अर्पण केले, असे प्रतिपादन शांताक्का यांनी केले.