मार्च महिन्यापासून कोरोना संबंधित विविध कामांसाठी आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत अनेक शिक्षकांच्या सेवा संलग्न करण्यात आल्या होत्या. शैक्षणिक सत्र सुरू करण्यासबंधाने शिक्षण विभागाकडून मार्गदर्शक सूचना निर्गमित करताना सुरुवातीला जून व नंतर ऑगस्ट महिन्यात शिक्षकांना कोरोना कामातून कार्यमुक्त करण्याबाबत सूचित केले होते. परंतु त्यानंतरही शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात आले नव्हते. अलीकडेच राज्य शासनाच्या शिक्षण विभागाकडून एक परिपत्रक निर्गमित करून शाळेत शिक्षकांची पन्नास टक्के उपस्थिती बंधनकारक केली. शिवाय २३ नोव्हेंबरपासून इयत्ता ९ वी ते १२ वीचे वर्ग सुरू करण्याचे निर्देश दिले. त्याअनुषंगाने शिक्षक संघटनांकडून वारंवार शिक्षकांना कार्यमुक्त करण्यासंदर्भात मागणी केली जात होती. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेत सर्व शिक्षकांना कोरोना कामातून कार्यमुक्त करण्याचे आदेश नुकतेच सर्व तहसीलदारांना दिले.
त्यानुसार काही तहसीलदारांकडून कार्यवाही केली. परंतु हिंगणा तहसीलदार अक्षय पोयाम यांनी त्यातूनही पळवाट शोधत इयत्ता ९ वी ते १२ चे वर्ग सुरू होत असल्याने त्याच वर्गाच्या शिक्षकांना कोरोना कामातून कार्यमुक्त करण्याचे आदेश काढले. याबाबत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष लीलाधर ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने तहसीलदार अक्षय पोयाम यांची भेट घेऊन कोरोना कामातून सर्वच शिक्षकांना कार्यमुक्त करावे, अशी मागणी एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे. शिष्टमंडळात निळकंठ लोहकरे, राजेंद्र कुकडे, अनिल देशभ्रतार, नितीन बांगडे, नरेंद्र आंबटकर, मनोज गौर, संजय बुरंगे, राजकुमार क्षीरसागर आदी सहभागी होते.