योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ठाकरे घराण्यातील पुढील राजकीय वारस म्हणून आदित्य ठाकरेसोबतच तेजस ठाकरेच्या नावाचीदेखील चर्चा सुरू आहे. तेजसच्या राजकीय ‘एन्ट्री’संदर्भात विविध कयास लावण्यात येत आहेत. परंतु या सर्व शक्यता केवळ कल्पनाविलास असून सद्यस्थितीत तरी तेजसच्या राजकीय प्रवेशाबाबत काहीच विचार नसल्याचे शिवसेना पक्षप्रमुख यांनी स्पष्ट केले आहे. नागपुरात पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी आले असताना ‘लोकमत’जवळ त्यांनी ही भावना व्यक्त केली.शिवसेनाप्रमुखांच्या हयातीतच उद्धव यांचे थोरले पुत्र आदित्य ठाकरे यांची राजकारणाशी समरस होण्यास सुरुवात झाली होती. अगदी २००९ च्या लोकसभा-विधानसभा निवडणुकांतदेखील ते सक्रिय होते. त्यानंतर युवा सेनेचे नेतृत्वदेखील त्यांच्याकडे आले. त्यांच्या नेतृत्वातच मुंबई विद्यापीठाच्या विधीसभेच्या निवडणुकांमध्ये युवा सेनेने सर्वच्या सर्व दहाही जागा जिंकण्याचा विक्रम केला. जानेवारी महिन्यात पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत आदित्य ठाकरे यांची पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतरच युवा सेनेची जबाबदारी तेजस ठाकरेकडे येईल, असे अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त होण्यास सुरुवात झाली. शिवसेनेच्या विविध जाहिरातींमध्येदेखील तेजस ठाकरे यांचे छायाचित्र आल्यामुळे चर्चांना आणखी बळ मिळाले. मात्र उद्धव ठाकरे यांनी या साऱ्या चर्चा खोडून काढल्या आहेत.तेजस अजून वयाने लहान आहे. त्यामुळे त्याच्या राजकीय भविष्याबाबत आत्ताच बोलणे योग्य होणार नाही. शिवाय त्याच्या आवडीचे क्षेत्र वेगळे आहे. त्याला जे करायचे आहे, त्याला आम्ही पूर्ण प्रोत्साहन देत आहोत. राजकारणात यावे की नाही हे त्याचे तो ठरवेल. आम्ही त्याच्यावर कुठलाही दबाव टाकणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
तेजस राजकारणापासून दूरचतसे पाहिले तर तेजस अद्यापही राजकारणापासून अंतरच राखून आहे. तेजस ठाकरेला वन्यजीवक्षेत्रामध्ये विशेष रस आहे. २०१७ साली झालेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांत काही वेळा शिवसेना शाखांमध्ये तसेच कार्यक्रमांमध्ये उद्धव ठाकरेंसमवेत तेजस दिसला होता. मात्र सक्रिय कार्यातून अजूनही तेजस दूरच आहे.