परतणाऱ्यांची संख्या वाढली : एसटी सुरू करणार सहा आंतरराज्यीय बसेस
दयानंद पाईकराव
नागपूर : लॉकडाऊनमध्ये रोजगार नसल्यामुळे तेलंगणा राज्यातील हजारो कामगार आपल्या राज्यात परत गेले. अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर हे कामगार परत येणे सुरू झाले. सोबतच तेलंगणा राज्यात ये-जा करणाऱ्या इतर प्रवाशांची संख्याही वाढल्यामुळे एसटीला ‘रिस्पॉन्स’ वाढला आहे. त्यासाठी एसटी महामंडळाने १ फेब्रुवारीपासून तेलंगणा राज्यात आदिलाबादसाठी ५ तर हैदराबादसाठी एक अशा सहा बसेस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोनामुळे एसटीची चाके ठप्प झाली होती. परप्रांतीय कामगारांना एसटीने त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत पोहोचविले. परंतु अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर हे कामगार परत नागपूर तसेच विदर्भात येणे सुरू झाले आहे. मात्र सध्या एसटीच्या दोनच बस हैदराबादला ये-जा करतात. या बसेसला प्रवाशांचा प्रतिसाद वाढला आहे. प्रवाशांची संख्या वाढत असल्यामुळे एसटी महामंडळाने तेलंगणा राज्यात सहा बसेस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार तेलंगणा प्रादेशिक परिवहन आयुक्तांची परवानगी धेतल्यानंतर पॅसेंजर टॅक्स भरून सहा बसेस चालविण्याची मंजुरी मिळविण्यात आली आहे. आगामी १ फेब्रुवारीपासून या बसेस सुरू होणार आहेत. यात आदिलाबाद येथे सकाळी ५.३० वाजता, सकाळी ७ वाजता, सकाळी १०.४५ वाजता, सकाळी ११ वाजता आणि दुपारी ४ वाजता, तर हैदराबादसाठी सकाळी ८.१५ वाजता बसेस सोडण्यात येणार आहेत.
..............
एसटीने भरला ७.८० लाख पॅसेंजर टॅक्स
तेलंगणा राज्याशी झालेल्या करारानुसार एसटी महामंडळाला हैदराबादसाठी दोन आणि आदिलाबादसाठी दोन बसेस चालविण्याची परवानगी आहे. बसेस चालविण्यासाठी तेलंगणा राज्य परिवहन आयुक्तांकडे पॅसेंजर टॅक्स भरावा लागतो. तेलंगणा राज्यात सहा बसेस सुरू करावयाच्या असल्यामुळे एसटी महामंडळाला पॅसेंजर टॅक्सच्या रूपाने ७.८० लाख रुपये भरावे लागले. त्यानुसार तीन महिने या सहा बसेस तेलंगणा राज्यात ये-जा करू शकतील.
महामंडळाच्या उत्पन्नात भर पडणार
‘अनलॉकनंतर तेलंगणा राज्यात बसेस सुरू करण्यासाठी तात्पुरता परवाना मिळण्यास विलंब झाला. परंतु १ फेब्रुवारीपासून तीन महिन्यांसाठी परवाना मिळाल्यामुळे सहा बसेस सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय टळणार असून एसटी महामंडळाच्या उत्पन्नातही भर पडणार आहे.’
-नीलेश बेलसरे, विभाग नियंत्रक, नागपूर विभाग
............