‘कॅमेरा ट्रॅप लावणार : वन विभाग घेणार शोध नागपूर : तेलंगणातील पैनगंगेच्या जंगलात दिसून आलेला वाघ हा ‘जय’ च आहे, की नाही. याचा शोधण्यासाठी महाराष्ट्राचा वन विभाग स्वत: तेथील जंगलात कॅमेरा ट्रॅप लावणार असल्याची माहिती पुढे आली आहे. सोमवारी पैनगंगेच्या जंगलात ‘जय’ दिसल्याची वार्ता पसरली होती. त्यावर स्वत: राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी थेट तेलंगणाचे वनमंत्री जोगारामन्ना यांच्याशी चर्चा केली. तसेच महाराष्ट्रातील वन अधिकाऱ्यांना तातडीने तेलंगणात जाऊन ‘त्या’ वाघाचे छायाचित्र आणि व्हिडिओ क्लिप आणण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार महाराष्ट्राचा वन विभाग कामाला लागला असून, लवकरच पैनगंगेच्या जंगलात कॅमेरा ट्रॅप सज्ज केले जाणार आहेत. मंगळवारी दिवसभर नागपूर वन विभागात ‘जय’ सापडल्याची चर्चा रंगली होती. नागपूर वन विभागातील काही वरिष्ठ वन अधिकाऱ्यांनी तेलंगणा वन विभागातील अधिकारी मित्रांना फोन करून ‘त्या’ वाघासंबंधी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला . परंतु कुणीही तो वाघ ‘जय’ च असल्याचा ठोस पुरावा दिला नसल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले. ‘जय’ हा मागील आठ महिन्यापूर्वी उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातून अचानक गायब झाला आहे. तेव्हापासून नागपूर वन विभाग त्याचा युद्धपातळीवर शोध घेत आहे. त्याचवेळी ‘जय’ सोबत काही घातपात तर झाला नाही, ना, या शंकेने राज्य शासनाने या संपूर्ण प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी सुरू केली आहे. त्यानुसार एसआयटीच्या पथकाने अलिकडेच खासदार नाना पटोले यांच्या घरी नागपूर जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षकांसह काही वन्यजीव प्रेमींना बोलावून त्यांचे बयान नोंदविले होते. (प्रतिनिधी)
जय’साठी तेलंगणा वारी
By admin | Published: December 28, 2016 3:22 AM