नागपूर : कुणबी ओबीसी आंदोलन कृती समितीतर्फे आरक्षण बचावच्या मागणीसाठी संविधान चौकात सुरू असलेल्या बेमुदत आंदोलनाला मंगळवारी तेली, माळी, पवार, शाहू अशी विविध समाजाच्या संघटनांनी पाठिंबा दिला. समाजाच्या प्रतिनिधींनी आंदोलन स्थळी येऊन समर्थनाचे पत्र कृती समितीचे अध्यक्ष पुरुषोत्तम शहाणे पाटील यांना सुपूर्द केले.
समस्त तेली समाज संघटना नागपूर अंतर्गत तेली समाज संघटनेच्या सर्व शाखीय, सर्व पक्षीय प्रतिनिधींची बैठक मंगळवारी सकाळी जवाहर विद्यार्थी गृह सिव्हिल लाईन येथे झाली. या बैठकीत मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही. परंतु ओबीसी समाजाला मिळत असलेल्या १९ टक्के आरक्षणाला धक्का लागू नये, अशा मागणीचा ठराव यावेळी घेण्यात आला. बैठकीनंतर संयोजक सुभाष घाटे, माजी उपमहापौर शेखर सावरबांधे, ईश्वर बाळबुधे, नयना झाडे यांच्यासह तेली समाज प्रतिनिधींनी आंदोलनस्थळी दाखल होत ओबीसी आंदोलनास समर्थन असल्याचे पत्र सुपुर्द केले.
याशिवाय अखिल भारतीय राठोड शाहू समाज संघटनेचे अध्यक्ष उमेश शाहू, नागपूर माळी समाजाचे प्रा. अरुण पवार, गुलाब चिकाटे, रविंद्र अंबाडकर, अजय गाडगे, शरद चांदोरे, पवार समाज संघटनेने समर्थनाचे पत्र देत आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला.
विविध पक्षांच्या नेत्यांचे समर्थन
- कृती समितीने तिसऱ्या दिवशी आंदोन स्थळी भेट देणाऱ्या नेत्यांना मंचावरून बोलण्यास संमती दिली. माजी गृहमंत्री अनिल देशमुख, भाजप नेते व धनगर समाज आरक्षण चळवळीतील प्रमुख माजी खा. डॉ. विलास महात्मे, आ. ॲड. अभिजित वंजारी, माजी आ. प्रकाश गजभिये यांनी ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावू नये, अशी भूमिका मांडली. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मुक्ता कोकड्डे, माजी अध्यक्ष रश्मी बर्वे, सलील देशमुख, माजी विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, नगरसेवक प्रशांत धवड, रेखा बाराहाते, राष्ट्रवादीचे प्रवक्ते वेदप्रकाश आर्य, अविनाश गोतमारे आदींनी आंदोलनस्थळी भेट देत समर्थन दिले.