लाेकमत न्यूज नेटवर्क
हिंगणा : नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाच्या कामामुळे शेतकऱ्यांची वहिवाट बंद झाल्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट काेसळले आहे. शेतशिवारात वाहन वा बैलगाडीची नेणे कठीण झाले असल्याने पिके शेतातच सडत आहेत. शेतात जायचे कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमाेर उभा ठाकला आहे. त्यामुळे शेतीच्या वहिवाटीचा रस्ता त्वरित माेकळा करण्याची मागणी जि.प. सदस्य दिनेश बंग, सरपंच कवडूजी भाेयर यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
या महामार्गाचे काम करीत असलेल्या कंत्राटदारांनी व एमएसआरडी विभागाने शेतकऱ्यांच्या वहिवाटीचे रस्ते पूर्णत: बंद केले आहे. परिणामी, उत्पादित शेतमाल बाजारात नेण्यासाठी शेतीपर्यंत वाहन किंवा बैलगाडी घेऊन जाता येत नाही. त्यामुळे शेतातील पिके शेतातच सडतात. यात शेतकऱ्यांचे माेठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान हाेत आहे.
आधीच हिंगणा तालुक्यातील शेतकरी ओला व काेरड्या दुष्काळी परिस्थितीमुळे कमालीचे आर्थिक संकटात आहेत. त्यातच काेराेना काळातील लाॅकडाऊनचा फटका आणि आता शेतीची वहिवाट बंद झाल्याने दुष्काळात तेरावा महिना अशी स्थिती निर्माण झाली आहे. याकडे गांभीर्याने लक्ष पुरवून बंद करण्यात आलेले शेतकऱ्यांच्या वहिवाटीचे रस्ते तत्काळ माेकळे करण्यात यावे, अथवा शेतकऱ्यांना शेतातील शेतमाल बाजारात नेण्याकरिता पर्यायी रस्त्याची व्यवस्था करून देण्यात यावी, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी तहसीलदार संताेष खांडरे यांना निवेदन दिले आहे. यावेळी जि.प. सदस्य दिनेश बंग, सरपंच कवडूजी भाेयर यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळात दिलीप नेहारे, देवमन उईके, राजेंद्र उईके, महादेव उईके, हरिश्चंद्र सयाम, सुधाकर उईके, चिरकूट काेरचे, महेश उईके, राजकुमार निब्रड, राजेंद्र ढाेके आदींसह शेतकरी उपस्थित हाेते.