नागपूर : राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांत शिक्षकांची पदे मोठ्याप्रमाणात रिक्त असल्याने ३४ जिल्हा परिषदांतील १२ हजार ५२२ पदांसाठी भरती प्रक्रिया राबण्यात आली. नागपूर जिल्हा परिषदेतही मार्च महिन्यात भरती प्रक्रीया पार पडली आहे. मात्र शिक्षक भरतीनंतरही जिल्ह्यातील जवळपास ६५० शिक्षकांची पदे रिक्त राहणार आहेत. त्यामुळे भरतीनंतरही ग्रामीण भागातील अनेक शाळा शिक्षकांपासून वंचित राहण्याची अथवा एकच शिक्षक राहण्याची शक्यता आहे.
नागपूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या जवळपास १५१२ शाळा असून चार हजारांवर शिक्षकांची पदे मंजूर आहेत. त्यापैकी ९७५ पदे रिक्त होती. यातील ३२५ पदे भ्ण्यात आली. शिक्षकांची पदे रिक्त असल्याने अनेक दोन शिक्षकी शाळा ह्या एक शिक्षकी झाल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणापासून वंचित राहावे लागत असल्याची परिस्थिती आहे.
भरती प्रक्रियेमुळे ३२५ पदे भरली गेल्याने शिक्षण विभागाला काहीसा दिलासा मिळाला असला, तरी ग्रामीण भागातील शिक्षकांची कमतरता भरून काढण्यासाठी शिक्षण विभागाची चांगलीच ओढाताण होण्याची शक्यता आहे. काही महिन्यापूर्वी शासनाने सेवानिवृत्त शिक्षकांना मानधनतत्त्वावर नियुक्ती देण्याचा निर्णय घेतला. परंतु या नियुक्तीला नागपूर जिल्ह्यात अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.