नागपूर : कोरोनाची दुसरी लाट मार्च व एप्रिल महिन्यात अधिक तीव्र होती. यामुळे दोन ते तीन महिन्यांनंतर त्याचे ‘साइड इफेक्ट’ दिसत आहेत. विशेषत: केस गळत असलेच्या समस्या असणाऱ्यांची संख्या वाढली आहे. मेडिकलच्या त्वचारोग विभागाच्या बाह्यरुग्ण विभागात येणाऱ्या ४०० रुग्णांपैकी जवळपास १०० रुग्ण केस गळतीचे, अचानक टक्कल पडल्याच्या समस्यांबाबतचे आहेत.
कोरोनाची दुसरी लाट अधिक भयावह ठरली. जानेवारी ते जुलै दरम्यान साडेतीन लाखांवर रुग्ण एकट्या नागपूर जिल्ह्यात आढळून आले. यामुळे कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी त्याचे दुष्परिणाम आताही दिसून येत आहेत. सुरुवातीला ‘म्युकरमायकोसिस’, नंतर ‘लंग फायब्रोसिस’ व आता त्वचेच्या समस्येसोबतच केस गळतीचे रुग्ण वाढले आहेत. डॉक्टरांच्या मते, कोरोनानंतर पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये केस गळण्याची समस्या अधिक आहे. यामागे कोरोनामुळे वाढलेला तणाव म्हणजे ‘टेलोजन एफ्लुवियम’ व औषधांचा प्रभाव आहे. यामुळे ताण कसा कमी करता येईल, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
- केसाच्या मुळांना पुरेसे ऑक्सिजन मिळत नाही
तज्ज्ञाच्या मते, कोरोनाचा केवळ एका अवयवावर नाही तर संपूर्ण शरीरावर त्याचा प्रभाव पडतो. कोरोनामुळे आलेल्या तणावामुळे केसांच्या मुळांना पुरेसे ऑक्सिजन मिळत नाही. ताण वाढल्यामुळे ‘फेलिकल रेस्ट फेज’मध्ये जातात.
- १० टक्के रुग्णांमध्ये केस गळण्याची समस्या
कोरोनापूर्वी व नंतर होणारे त्वचारोग यावर मेडिकलच्या त्वचारोग विभागात अभ्यास सुरू आहे. या अभ्यासात कोरोनानंतर जवळपास १० टक्के लोकांमध्ये केस गळण्याची समस्या दिसून आली. यात महिलांची संख्या अधिक आहे. काही महिलांचे अधिक केस गळल्याने त्यांचे टक्कल पडल्याचे आढळून आले आहे.
- तणावाला दूर ठेवणे, केसांची काळजी व योग्य आहार
गळालेल्या केसांनंतर पुन्हा नव्याने केस येतात. परंतु केस येण्याच्या अवस्थेत ताण असल्यास समस्या उद्भवू शकतात. अशा परिस्थितीत केसांची काळजी घेणे, योग्य आहार निवडणे महत्त्वाचे आहे. तणावाला दूर ठेवण्याचा प्रयत्न करायला हवे. तरीही केसांची स्थिती सुधारत नसेल तर त्वरित तज्ज्ञाचा सल्ला घ्यायला हवा.
- डॉ. जयेश मुखी, प्रमुख त्वचा व गुप्तरोग विभाग, मेडिकल