लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर (कोराडी) : कोराडी वीज केंद्रात कंत्राटी कामगार म्हणून काम करणाऱ्या एका कामगाराने आपण आपल्या कुटुंबीयांसह काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झालेल्या रुग्णाच्या संपर्कात आलो होतो. त्यामुळे कदाचित आपणही कोरोनाचा रुग्ण होऊ शकतो अशी माहिती देऊन औष्णिक विद्युत केंद्रात अधिकारी कर्मचारी व कंत्राटी कामगारांमध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या बाबतीत सखोल चौकशीनंतर कोराडी विद्युत केंद्राने कोराडी पोलिसात तक्रार दाखल केली. यावर पोलिसांनी अफवा पसरवणाऱ्या या कामगाराला अटक केली आहे. चुकीची माहिती देऊन आपल्या कर्तव्यातून सुटी घेऊन सुटका करण्याचा प्रयत्न आरोपीचा असावा अशी चर्चा आहे.सविस्तर वृत्त असे की विद्युत केंद्रात कंत्राटी कामगार म्हणून काम करणारा तांदूळवाणी येथील कामगार रमेश खुजे याने दोन दिवसापूर्वी विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांना दिलेल्या माहितीनुसार आपण आपल्या कुटुंबीयांसह काही दिवसापूर्वी एका महिलेच्या संपर्कात आलो होतो. त्या महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे आपल्यालाही कोरोनाचे संक्रमण झाल्याचा संशय येत असल्याची माहिती दिली . त्यानंतर आपण कोराडी वीज केंद्रात काम केल्याचेही त्यांनी सांगितले. या घटनेने कोराडी वीज केंद्रात सर्वत्र खळबळ निर्माण झाली. वीज केंद्र हे अत्यावश्यक सेवेत मोडत असल्याने वीज निर्मितीसाठी सर्व कामगार कर्मचारी अभियंते नियमित सेवेत असणे अत्यावश्यक आहे. अशा परिस्थितीत या अफवेमुळे अनेक कामगार ,कर्मचारी ,अधिकारी धास्तावले होते. नेतृत्वाला वीज केंद्र चालविण्यासाठी संदर्भात या अफवेने मोठा प्रश्न निर्माण झाला असता. मुख्य अभियंता राजेश पाटील यांनी यासंदर्भात नागपूर येथील शासकीय रुग्णालयात चौकशी केली. चौकशीअंती यांनी दिलेली माहिती पूर्णपणे खोटी असल्याचे सिद्ध झाले. वीज केंद्राच्या अधिकाऱ्यांनी रमेश खुजे यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रत्येक टप्प्यावर चौकशी केली. यासंदर्भात मुख्य अभियंता राजेश पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर हे प्रकरण पोलिसांकडे देण्यात आले. पोलिसांनी खुजे विरुद्ध कलम १८८ व ५०५ नुसार गुन्हा दाखल करीत अटक केली आहे.क्षमतेने वीजनिर्मिती हीच प्राथमिकताऊर्जानिर्मिती हे अत्यावश्यक सेवेत मोडत असल्याने कुठल्याही परिस्थितीत वीज निर्मिती करणे हे आमचे प्राथमिक उद्दिष्ट आहे यासाठी येथे राबत असलेल्या अधिकारी कर्मचारी कंत्राटी कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होईल असा प्रयत्न कुणीही करू नये. असा प्रयत्न करणाऱ्यावर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा मुख्य अभियंता राजेश पाटील यांनी दिला.कोरोना संसर्ग संदर्भात कुठल्याही प्रकारची खोटी माहिती अथवा अफवा पसरविणाऱ्याची पोलीस गय करणार नाही. सोशल माध्यम अथवा इतर कुठल्याही माध्यमातून अशी अफवा पसरविणे समाजासाठी हिताचे नाही. असे कृत्य करणाऱ्यावर कठोर कारवाई करणार.नीलोत्पल, पोलीस उपाआयुक्त
सुटी घेण्यासाठी कोरोनाचा असाही बहाणा! वीज केंद्रातील कामगाराला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2020 9:54 PM
कोराडी वीज केंद्रात कंत्राटी कामगार म्हणून काम करणाऱ्या एका कामगाराने आपण आपल्या कुटुंबीयांसह काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झालेल्या रुग्णाच्या संपर्कात आलो होतो. त्यामुळे कदाचित आपणही कोरोनाचा रुग्ण होऊ शकतो अशी खोटी माहिती देऊन सुटी घेण्यासाठी बनवाबनवी केली .
ठळक मुद्देबाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याची दिली खोटी माहिती