लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दोन दिवसांपूर्वी वाढलेल्या तापमानाची पुन्हा सोमवारी घसरगुंडी झाली. नागपुरात कमाल तापमान २.५ अंश सेल्सिअसने खालावले. सकाळी आकाशात मोठ्या प्रमाणावर ढगांनी गर्दी केली असली तरी ८.३० वाजल्यानंतर दिवसभर कडक उन्ह पडले. ऊन-सावलीच्या लपाछपीत शहरात ३९.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
नागपुरात दोन दिवसांपासून रात्रीच्या वातावरणातही उकाडा जाणवत आहे. रविवारीही असेच वातावरण होते. मात्र, सोमवारी पहाटे आकाशात मोठ्या प्रमाणावर ढग दाटले. पावसासारखी स्थिती निर्माण झाली. नंतर आकाश निवळले. सकाळी शहरात आर्द्रता ७३ टक्के नोंदविण्यात आली, सायंकाळी घट होऊन ती ४८ टक्क्यांवर आली.
विदर्भात चंद्रपूरचे तापमान ४१.४ अंश सेल्सिअस असे सर्वाधिक होते. त्या खालोखाल यवतमाळ ४१.२, वर्धा ४१.० असे तापमान नोंदविले गेले, तर, बुलडाण्यात सर्वांत कमी ३६ अंश सेल्सिअस तापमान होते. विदर्भात सोमवारी सर्वच ठिकाणी तापमानात घट झाली. यवतमाळचे तापमान ३.७ ने सर्वाधिक घसरले, नागपूर २.५ ने, तर चंद्रपूरचे तापमान अंशत: ०.२ सेल्सिअसने किंचित घटले.
हवामान विभागाने पुढचे चार दिवस पुन्हा पावसाचा अंदाज वर्तविला आहे. पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम या जिल्ह्यांसाठी १ जूनला गारा, मेघगर्जना वादळी पावसाची शक्यता वर्तविली आहे.
नागरिकांना सावधगिरीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.