नागपूर : अद्याप होळी पार पडायची असतानाच विदर्भातील पारा तापायला सुरुवात झाली आहे. बुधवारी विदर्भातील बहुतांश शहरातील तापमान ४० अंश सेल्सिअसहून अधिक होते. अक्षरश: एप्रिल महिन्याप्रमाणे दुपारी झळा जाणवत होत्या. विदर्भात अकोल्यात सर्वाधिक ४२.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर नागपुरात पारा ४०.९ अंश सेल्सिअसवर गेला.
मंगळवारप्रमाणे बुधवारीदेखील अकोल्यात सर्वाधिक तापमान नोंदविण्यात आले. नागपुरात कमाल ४०.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. २४ तासांतच पाऱ्यामध्ये १.३ अंशांची वाढ झाली. किमान तापमान १९.९ अंश सेल्सिअस इतके होते. नागपुरात सकाळपासून वातावरण काेरडे हाेते. सकाळी आर्द्रता ४० टक्के हाेती, जी सायंकाळी घसरून २१ टक्क्यांवर पाेहोचली. विदर्भात अकोल्यापाठोपाठ वाशिम येथे ४१.५ तर वर्धा येथे ४१.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
तापमान वाढण्याची शक्यता
उष्ण वारे व सूर्यकिरणांनी नागपूरकरांचा त्रास वाढला आहे. सध्या राजस्थान व गुजरातमध्ये उष्ण लहरींची स्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार विदर्भातील बहुतेक जिल्ह्यांत उष्ण वाऱ्यांचे चटके बसण्याची शक्यता आहे. येत्या आठवड्यात तापमान ४० अंशांच्या वरच असेल, असा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आला आहे.
नागपूरचे तापमान
तारीख - तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
१३ मार्च - ३६.४
१४ मार्च - ३७.२
१५ मार्च - ३९.६
१६ मार्च - ४०.९
जिल्हानिहाय तापमान
जिल्हा - कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
अकोला - ४२.९
अमरावती - ४१.०
बुलडाणा - ३८.५
चंद्रपूर - ४०.६
गडचिरोली - ३७.४
गोंदिया - ३९.२
नागपूर - ४०.९
वर्धा - ४१.४
वाशिम - ४१.५
यवतमाळ - ४०.५