लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अश्विन नवरात्रासाठी श्री महालक्ष्मी जगदंबा देवी संस्थान कोराडी नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. नवरात्रोत्सवात सहभागी होणाऱ्या सुमारे १५ लाख भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता विश्वस्त मंडळाने भक्तांसाठी अधिकाधिक सुविधा देण्याचा प्रयत्न चालविला आहे. संस्थानने सुवर्ण मुखवटा व चांदीच्या आयुधासहीत तयार करून जगदंबेला चढविला आहे. आता तर मातेची मूर्ती असलेला संपूर्ण गाभारा सोन्याचांदीत मढवला जात आहे. पोलीस बंदोबस्त चोख राहणार असून हालचालींवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे.प्रमुख मार्गदर्शक व विश्वस्त तसेच पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आणि अन्य विश्वस्तांच्या प्रयत्नांनी मोठ्या प्रमाणात विकास करण्यात येत आहे. कोराडी देवी मंदिर विकास प्रकल्पाचा मूळ आराखडा १८४ कोटींचा होता. आता सुधारित आराखडा २०१ कोटींचा झाला आहे. तसेच टप्पा २ चा आराखडा ९८ कोटींचा आहे. या आराखड्यातून म्युझियम, सभामंडप, रस्ते, बसस्टॉप, शॉपिंग कॉम्प्लेक्स, पार्किंग, कॅनॉलवर स्लॅब टाकून भाविकांसाठ़ी रस्ता, या रस्त्याच्या शेजारी सोलर पॅनेल उभे करून मंदिराचा परिसरात सौर ऊर्जेवर आणण्यात येणार आहे. याशिवाय मंदिराशेजारी असलेल्या भव्य तलावातील गाळ काढून या पाण्यावरून सी प्लेन उडविण्यात येणार आहे. अशी विकास कामे मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे भक्तांना दिसते. या विकास कामांमुळे कोराडी देवी मंदिराचे रूपच पालटणार आहे. पर्यटन आणि तीर्थक्षेत्र अशी संकल्पना येथे राबविण्यात आली आहे. यामुळे सुरक्षित पर्यटन आणि तीर्थक्षेत्राचे पावित्र्य कायम राहणार आहे.सध्या कोराडी मंदिर आणि परिसरात मोठ्या प्रमाणात विकास कार्ये आणि जीर्णोध्दार सुरू आहे. मंदिर व्यवस्थापनाने आपले सामाजिक उत्तरदायित्व लक्षात घेऊन निराधार वृध्दांसाठी एक सर्व सुविधायुक्त वृध्दाश्रम निर्माण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. महिला आणि पुरुषांसाठ़ी स्वतंत्रपणे निर्माण होणऱ्या वृध्दाश्रमात एकूण ७० वृध्दांची व्यवस्था होईल. तसेच मंदिर परिसरात दिव्यांगांसाठी अपंग पुनर्वसन केंद्राचे निर्माण केले जात आहे, अशी माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. यावेळी यावेळी संस्थानचे अध्यक्ष अॅड.मुकेश शर्मा, सचिव केशवराव फुलझेले, विश्वस्त प्रेमलाल पटेल, बाबूराव भोयर, दत्त समरितकर, दयाराम तडसरकर आदी उपस्थित होते.
दररोज ५०० लोकांना अल्प दरात भोजनमानवसेवा म्हणून श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानने दररोज ५०० लोकांना अत्यंत कमी किमतीत पोटभर जेवण उपलब्ध करून देण्याच निर्णय घेतला आहे. समाजातील अनाथ मुलांना आधार मिळावा म्हणून मंदिर व्यवस्थापनाने सर्व सुविधायुक्त अनाथालयाचे निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे.