नागपूरच्या शिंगाडा मार्केटमधील मंदिर तुटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 11:06 PM2018-09-03T23:06:16+5:302018-09-03T23:06:54+5:30
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी नवीन शुक्रवारीतील शिंगाडा मार्केट परिसरामधील उद्यानात असलेल्या मंदिराला संरक्षण देण्यास नकार दिला. तसेच, नागराज महाराज व माँ अंबे चॅरिटेबल ट्रस्टचा यासंदर्भातील अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे संबंधित मंदिर तुटणार हे निश्चित झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी नवीन शुक्रवारीतील शिंगाडा मार्केट परिसरामधील उद्यानात असलेल्या मंदिराला संरक्षण देण्यास नकार दिला. तसेच, नागराज महाराज व माँ अंबे चॅरिटेबल ट्रस्टचा यासंदर्भातील अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे संबंधित मंदिर तुटणार हे निश्चित झाले.
न्यायालयाने गेल्या तारखेला अर्जावरील सुनावणी तहकूब करून ट्रस्टच्या अध्यक्षा प्रमिलाबाई सावरकर यांना समन्स बजावला होता. त्यानुसार सावरकर यांनी न्यायालयात हजेरी लावली. दरम्यान, त्यांनी मंदिर पाडण्यात येऊ नये अशी विनंती केली. परंतु, त्यांना मंदिराच्या बांधकामाची वैधता सिद्ध करता आली नाही. मंदिर उभे असलेली जागा सरकारची असून मंदिराचे बांधकाम करताना कुणाचीही परवानगी घेण्यात आली नाही. परिणामी, न्यायालयाने सावरकर यांना दिलासा देण्यास नकार दिला.
प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व मुरलीधर गिरटकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. यासंदर्भात न्यायालयात मनोहर खोरगडे व डॉ. गजानन झाडे यांची जनहित याचिका प्रलंबित आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. फिरदोस मिर्झा, महापालिकेतर्फे वरिष्ठ वकील सी. एस. कप्तान व अॅड. सुधीर पुराणिक तर, ट्रस्टतर्फे अॅड. जितेंद्र मटाले यांनी कामकाज पाहिले.