लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनामुळे २२ मार्च २०२० सुरू झालेली टाळेबंदी टप्प्याटप्प्यात अनलॉक प्रक्रियेअंतर्गत शिथिल झाली. मात्र सर्वाधिक गर्दीचे ठिकाण असलेली सर्व मतावलंबीयांची देवस्थळे आतापर्यंत बंदच होती. यासंदर्भात राज्य सरकारकडे विविध पक्ष, संघटनांनी देवाचे दार उघडण्याची विनवणी केली, आंदोलने केली. अखेर सोमवारपासून राज्यभरात देवस्थाने भक्तांसाठी उघडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्या अनुषंगाने भगवंताच्या दर्शनासाठी भाविक पहाटेपासूनच सज्ज होते. कपाट उघडताच, देवाचे दर्शन होताच भक्तांचा गहिवर ओसंडून वाहत असल्याचे भासत होते.
तब्बल आठ महिन्यांपासून देवदर्शनाविना भाविक, अशी स्थिती दिसून येत होती. अर्थात भक्तांनी भक्ती सोडली, असे नव्हते. जप, तप, साधना, आराधना सुरूच होत्या. पण मनाची कपाटे उघडण्यासाठी संकेतांची मोठी परंपरा आहे. आधुनिक काळात हे संकेत देवस्थळातून मिळतात अशी भाविकांची धारणा आहे. त्यामुळे ‘देवा कधी होईल रे तुझे दर्शन’ अशी विनवणी भक्त भगवंताकडे करत होते. संसर्गाचा वेग कमी करण्यासाठी किंवा रोखण्यासाठी प्रयत्नांचा एक भाग म्हणून राज्य सरकारने आतापर्यंत देवस्थानांना उघडण्याची परवानगी नाकारली होती. आता मात्र शुभ संकेताचा एक भाग म्हणून देवस्थाने भक्तांसाठी उघडण्यात आली आहेत. सकाळपासूनच भक्तांनी शहरातील विविध धार्मिक स्थळांमध्ये गर्दी केली होती. जणू टाळेबंदी पूर्णतः संपवण्याचा हा सोहळा एक साथ साजरा करण्याची इच्छा व्यक्त केली जात होती.
श्रीगणेश टेकडी मंदिर, श्री साई मंदिर, श्री पोद्दारेश्वर राम मंदिर, रामदासपेठेतील गुरुद्वारा, एसएफएस चर्च, धरमपेठेतील बुद्धविहार, दीक्षाभूमी, मोठा ताजबाग येथे त्याअनुषंगाने व्यवस्था लावण्यात येत होती. व्यक्तिश: अंतर जपणे, निर्जंतुकीकरण असणे, टेम्परेचर स्कॅनिंग आदी व्यवस्था या ठिकाणी लावण्यात येत होत्या. मात्र, अनेक देवस्थान व्यवस्थापनाने प्रार्थना स्थळे बंद ठेवण्याचाच विचार केल्याचेही दिसून येत होते. प्रत्येक देवस्थानांमध्ये नैमित्तिक पूजनाव्यतिरिक्त टाळे लागलेलेच दिसून येत होते.
गणेशाला महाआरतीद्वारे घातले साकडे
श्री गणेश टेकडी मंदिरात भव्य महाआरतीने राज्य शासनाच्या निर्णयाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यासाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित झाले होते. हे देवा कोरोनाला आता पळव, अशी आर्त विनवणी याद्वारे करण्यात आली. महाआरतीनंतर मात्र मोजक्याच लोकांना दर्शनासाठी सोडण्यात येत होते.
साई मंदिरात मागच्या दाराने प्रवेश
वर्धा महामार्गावरील श्री साई मंदिरात निर्माण कार्य सुरू असल्याने, मागच्या दाराने भक्तांना प्रवेश दिला जात आहे. प्रसाद वितरण न करण्याचा निर्णय घेतला असून, एका वेळी २५ महिला व २५ पुरुष भक्तांनाच प्रवेश दिला जात आहे. हात पाय धुण्याची व्यवस्था, टेम्परेचर स्कॅनिंग, व्यक्तिश: अंतर, मास्क, सॅनिटाझरची व्यवस्था करण्यात आली आहे.
- अविनाश शेगावकर, श्री साई मंदिर
मोठ्या ताजबागमध्ये मास्क अनिवार्य
मोठ्या ताजबागमध्ये भक्तांना मास्क अनिवार्य आहे. एकावेळी मोजक्या लोकांना सोडण्यात येत असून, पहिली खेप परत आली की दुसरी खेप सोडण्यात येत आहे. दर्शनासाठी रेखांकन करण्यात आले असून, सातत्याने काळजी घेण्याची उद्घोषणा केली जात आहे.
- गुणवंत कुबडे, प्रशासक - मोठा ताजबाग
अनेक प्रार्थना स्थळांमध्ये तयारी
रामदासपेठ येथील गुरुद्वारामध्ये सकाळीच नैमित्तिक प्रार्थना झाली. सदर येथील एसएफएस चर्चमध्येही सकाळीच मोजक्या लोकांसोबत प्रार्थना करण्यात आली. तसेही चर्चमध्ये रविवारी सामूहिक प्रार्थना होत असल्याने, इतर दिवशी गर्दी नसतेच. धरमपेठ येथील बुद्धविहारातही अशीच स्थिती होती. शिवाय, शहरातील अनेक प्रार्थनास्थळांमध्ये भक्तांसाठी विशेष नियमाअंतर्गत तयारी केली जात असल्याचे चित्र होते.