दोन कोटींचा प्रकल्प १० कोटींवर
अनेकश्वर मेश्राम
बल्लारपूर तालुक्यातील दहा गावातील शेतकºयांना प्रगतीची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी पळसगाव - आमडी उपसा सिंचन योजना आकारास आली. सन १९९९ मध्ये १ कोटी ९३ लाख १५ हजार रुपये किमतीच्या प्रकल्पाला मान्यता मिळाली. मात्र प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे दोन कोटीचा प्रकल्प १० कोटी रुपयांवर पोहोचला आहे. तब्बल १४ वर्षापासून सिंचन प्रकल्पाचा वनवास कायमच असल्याचे वास्तव समोर आले आहे. पळसगाव - आमडी उपसा सिंचन योजना तालुक्यात एकमेव आहे. कळमना गावाजवळ वर्धा नदीच्या डाव्या तिरावर बांधकाम सुरु आहे. धानाचे पिक घेणाºया शेतकºयांना सदर प्रकल्प वरदान ठरणार आहे. मात्र लघु पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे प्रकल्पाचे काम तीन वर्षापासून कासवगतीने पुढे जात आहे. परिणामी प्रकल्पाचे दर सुधारित करण्याची पाळी दरवर्षी विभागावर येत आहे. या प्रकारामुळे प्रकल्पाची किंमत वाढत जात आहे. सदर योजनेचे लाभक्षेत्र दोन भागात विभागण्यात येणार आहे. यासाठी दोन ऊर्ध्वनलिका प्रस्तावित आहेत. ऊर्ध्वनलिका एकच्या माध्यमातून पळसगाव, आमडी, कळमना, कोर्टीमक्ता, कोर्टी तुकूम, जोगापूर, आष्टी येथील दोन हजार १७० हेक्टर जमिनीला सिंचन सुविधा देण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. ऊर्ध्वनलिका दोनच्या पाईप लाईनद्वारे लावारी, दहेली, व बामणी (दुधोली) गावातील ७२० हेक्टर जमिनीस सिंचन क्षमता उपलब्ध करुन देण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे. बल्लारपूर तालुक्यातील कृषी क्षेत्र मोठ्या प्रमाणात कोरडवाहू आहे. येथील शेतकºयांना निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकºयांना दरवर्षी सोसावा लागतो. परिणामी शेतकºयांना शेतीमधील उत्पादन खर्च व उत्पन्नातील तफावत या समस्येला नेहमी सामोरे जावे लागते. यावर उपयायोजना करण्याच्या अनुषंगाने व कृषी क्षेत्राला समृद्धीच्या दिशेने नेण्यासाठी पळसगाव- आमडी उपसा सिंचन योजना कार्यान्वित करण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून २ हजार ८९० हेक्टर कृषी क्षेत्र ओलिताखाली येण्याचे स्वप्न उराशी बाळगणाºया शेतकºयांच्या नशिबी आजघडीला निराशा आली आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती व्यवसाय परवडणारा असल्याचे शेतकºयांना जाणवत नाही. शेतीला सिंचनाची सुविधा म्हणून उपसा सिंचन योजना आणली. मात्र योजना पूर्णत्वास नेण्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव दिसून येत आहे. लघु पाटबंधारे विभागातील अधिकारीही सुस्तावले आहेत. राजकीय जनप्रतिनिधी व अधिकारी वर्ग यांच्यातील समन्वयाअभावी पळसगाव-आमडी उपसा सिंचन योजनेचा वनवास केव्हा संपणार तूर्तास सांगता येत नाही.