कमल शर्मा
नागपूर : दहा वर्षांनंतर राज्यात पुन्हा एकदा लाेडशेडिंगचे संकट निर्माण झाले आहे. परंतु सध्या तात्पुरता दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारची एनटीपीसी मदतीला आली असून महाराष्ट्राला ४७१० मेगावॉट वीज उपलब्ध होत आहे. परिणामी गेल्या दोन दिवसांपासून वीज कपात झालेली नाही. दरम्यान मागील पाच दिवसांपासून राज्यात कुठेही भारनियमन झाले नसून अखंडित वीज पुरवठा सुरू असल्याचा दावा महावितरणने केला आहे. या दोन्ही गोष्टी विचारात घेता नागरिकांना सध्यातरी लोडशेडिंग पासून तात्पुरता दिलासा मिळाला आहे.
महाराष्ट्रात वीज संकट निर्माण झाले आहे. राज्य सरकारने यासाठी केंद्र सरकारला जबाबदार धरले आहे. केंद्राकडून पुरेसा कोळसा उपलब्ध होत नसल्याने वीज केंद्रातील साठा काही दिवसांपुरताच शिल्लक राहिला आहे. त्यामुळे वीज केंद्र पूर्ण क्षमतेने चालत नाहीत. १०,२१२ मेगावॉट क्षमतेच्या केंद्रातून केवळ ६,५२६ मेगावॉट विजेचे उत्पादन होत आहे. दुसरीकडे सोलापूर येथील बंद युनिटला सुरू करून एनटीपीसीने आता महाराष्ट्राला ४७१० मेगावॉट वीज द्यायला सुरुवात केली आहे. महावितरण सूत्रांचे म्हणणे आहे की, एक-दोन दिवसात एनटीपीसीचे आणखी एक युनिट सुरू होऊन ५०० मेगावॉट अधिकची वीज मिळू लागेल.
महावितरणच्या लोड व्यवस्थापनाशी संबंधित एका अधिकाऱ्याने सांगितले की, एनटीपीसीकडून मिळत असलेल्या अतिरिक्त विजेमुळे कोयनासह इतर हायड्रो प्रकल्पातून सध्या केवळ २९१ मेगावॉट विजेचे उत्पादन केले जात आहे. या प्रकल्पातील पाणी संकटाच्या काळासाठी वाचवून ठेवले जात आहे. त्यांनी सांगितले की, मागणी २७ हजार मेगावॉट वरून २३,१५० मेगावॉट वर आली असल्यानेही कंपनीला थोडा दिलासा मिळाला आहे.
- संकट कायम आहे
महावितरणसाठी अजूनही सकाळी व सायंकाळी ५ ते ८ वाजेची वेळ संकटाची ठरत आहे. कंपनीच्या सूत्रांनुसार या काळात सौर ऊर्जाचे उत्पादन कमी होत आहे. त्यामुळे या काळात विजेच्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवणे कठीण होत आहे. मागणी वाढल्यावर जी-ग्रुप क्षेत्रात पुन्हा लोडशेडिंग करावी लागू शकते.