नागपूर: शेअर बाजारात पैसे गुंतवायच्या नावाने एका तरुणाला जाळ्यात ओढून तब्बल साडेदहा लाखांची फसवणूक करण्यात आली. लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून आरोपीने इतरही अनेकांना अशा पद्धतीने गंडा घातल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अनिल देशमुख असे आरोपीचे नाव आहे. लकडगंज येथील लक्ष्मीनिवास येथील रहिवासी सौरभ बाबुलाल पटेल (३७) यांची देशमुखसोबत ओळखी होती.
देशमुखने पटेल यांना शेअर बाजारात पैसे गुंतविण्यास सांगितले. नेमके पैसे कुठे गुंतवायचे याच्या टीप्स मी देईल असे सांगत चांगला नफा होईल, असे प्रलोभन दाखविले. पटेल यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. ११ जुलै ते ११ ऑगस्ट या महिन्याभराच्या कालावधीत त्यांनी आरोपी देशमुखला साडेदहा लाख रुपये वेगवेगळ्या बॅंक खात्यांमधून दिले. मात्र पटेल यांना नफा मिळाला नाही. पटेल यांनी देशमुखला विचारणा केली असता तो टाळाटाळ करू लागला. पटेल यांनी त्याला पैसे मागितले, मात्र देशमुखने उडवाउडवीची उत्तरे देत पैसे परत देण्यास नकार दिला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पटेल यांनी लकडगंज पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी देशमुखविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे.