- बी. संदेश
आदिलाबाद - नागपूरवरून तेलंगणाकडे जाणा-या वाहनातून शुक्रवारी सायंकाळी दहा कोटी रुपयांची रोकड आदिलाबाद पोलिसांनी जप्त केल्याने खळबळ उडाली आहे. तेलंगाणात डिसेंबरमध्ये होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही रोकड नेली जात असावी, असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. आदिलाबादमधील पीपरवाडा टोल प्लाझा येथे जैनक पोलिसांनी बोलेरो (क्र. केए-४६-एम-६०९५) या वाहनाची तपासणी केली असता त्यात दहा कोटी रुपयांची रोकड आढळून आली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून परमेशकुमार (४१) व विनोद शेट्टी (३५) रा. कर्नाटक यांना अटक केली. आदिलाबादचे पोलीस अधीक्षक विष्णू वरीअर यांनी सांगितले की, रकमेबाबत प्राप्तीकर खात्याच्या अधिकाºयांना माहिती देण्यात आली आहे. ही रक्कम नेमकी कुणाची याचा शोध घेतला जात आहे. सदर वाहन नागपूरवरून आले आहे. त्यातील रक्कम बेंगलूरच्या एका कंपनीची असल्याचा दावा गाडीतील लोकांनी केला आहे. मात्र त्याबाबत तत्काळ कोणतीही कागदपत्रे उपलब्ध झालेली नाही. अटकेतील दोन्ही आरोपींशी संवाद साधताना पोलिसांना भाषेची अडचण निर्माण होत आहे. ६ डिसेंबरला तेलंगाणा विधानसभेची निवडणूक होत आहे. त्याची आचारसंहिता लागू आहे. या निवडणुकीसाठी तर ही रक्कम येत नसावी ना, असा संशय व्यक्त केला जात आहे. दहा कोटींच्या रकमेत सर्व पाचशेच्या नोटा आहेत. ही रक्कम तेलंगाणातील सत्ताधारी पक्षाची असावी, असा सूर काँग्रेसच्या गोटातून आळवला जात असला तरी त्याबाबत अद्याप अधिकृत कुणीही प्रतिक्रिया दिलेली नाही.