लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोविड-१९ मुळे आरोग्य यंत्रणा सक्षम असल्याशिवाय नागरिकांना चांगले उपचार शक्य नसल्याचे स्पष्ट झाले. प्राथमिक आरोग्य सुविधा देणे ही महापालिकेची जबाबदारी आहे. याचा विचार करता मनपाचे सर्व दवाखाने अद्ययावत करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्याला सुरुवात केली आहे. सोबतच सर्व दहा झोनमध्ये वैद्यकीय चमूसह चालता-फिरता दवाखाना सुरू केला जाणार आहे. आरोग्य विभागासाठी करण्यात आलेल्या ७० कोटींच्या तरतुदीतून यावर खर्च केला जाणार असल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके यांनी दिली.
टाटा ट्रस्ट व मनपा यांच्या संयुक्त उपक्रमातून २६ पैकी १७ अर्बन प्रायमरी हेल्थ सेंटर अद्ययावत करण्यात आले आहे. माफक दरात डायलिसीस सुविधा , अॅन्टी रॅबीज व्हॅक्सीन, रक्त पेढी , सिकल सेल जननी शिशू सुरक्षा कार्यक्रम दंत चिकित्सा, नेत्र चिकित्सा मनपाने उपलब्ध केल्या आहेत.पाचपावली व इंदिरा गांधी रुग्णालयात सुतिकागृहाची व्यवस्था आहे.
दहा शवपेट्या उपलब्ध करणार
मनपाच्या दहा झोनमध्ये दहा शवपेट्या उपलब्ध करण्याचा मानस पिंटू झलके यांनी व्यक्त केला. शहरातील दहन घाट व कब्रस्तानाचा विकास व विस्तार केला जाणार आहे. यासाठी ६.२५ कोटींची तरतूद केली आहे.
वंदेमातरम् उद्यानाची निमिर्ती
मनपा क्षेत्रतील एम्प्रेस मिलच्या परिसरातील एक लाख चौ.फूट जागेत वंदेमातरम् उद्यान निर्माण करण्याचा संकल्प अर्थसंकल्पात करण्यात आला आहे.सेनेतील अधिकारी, सरहद्दीवर लढणारे सैनिक असे सर्व रणवीर यांची माहिती व्हावी. यासाठी वंदेमातरम् उद्यानाची निमिर्ती केली जाणार आहे.
गणिती उद्यानाची निर्मिती
मौजा दिघोरी येथील बिरसा नगर भागात विद्याथ्यार्साठी स्केटिंग रिंग व गणिती उद्यान निर्माण करण्याचा मानस झलके यांनी व्यक्त केला आहे. यावर २३.४७ कोटी खर्च येणार आहे.