सचिन कुर्वे : जिल्हाधिकारी कार्यालयात संपर्कासाठी टोल फ्री क्रमांक लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : धर्मादाय रुग्णालयामध्ये निर्धन व दारिद्र्य रेषेखालील गरीब रुग्णांच्या उपचारासाठी दहा टक्के जागा राखीव ठेवणे बंधनकारक असून आयसीसीयूसह सर्वच वॉर्डात अशा रुग्णांवर मोफत व सवलतीच्या दराने उपचारासंदर्भातील सर्व माहिती रुग्णालयाच्या बाहेर ठळकपणे लावावी, असे निर्देश जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी दिले. जिल्ह्यातील नोंदणीकृत धर्मादाय रुग्णालयामध्ये निर्धन व गरीब रुग्णांवर मोफत व सवलतीच्या दराने उपचारासंदर्भात जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या अध्यक्षतेत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला आ. अनिल सोले, आ. डॉ. मिलिंद माने, धर्मादाय आयुक्त स्वयम शै. चोपडा, निवासी उपजिल्हाधिकारी के.एन.के. राव, मुख्यमंत्री सचिवालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. के. आर. सोनपुरे, डॉ. रवींद्र इंगोले उपस्थित होते. जिल्ह्यात धर्मादाय नोंदणीकृत २५ रुग्णालये असून या रुग्णालयांमध्ये दारिद्र्य रेषेखालील व्यक्तींना त्यांच्याकडे असलेल्या रेशनकार्डाच्या आधारे तसेच निर्धन व्यक्तींना तहसीलदाराने दिलेल्या उत्पन्न प्रमाणपत्राच्या आधारे उपचार बंधनकारक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. बीपीएलच्या रुग्णांचा संपूर्ण खर्च रुग्णालयांना करण्याच्या सूचना देताना प्रत्येक रुग्णालयात आयसीसीयूसह सर्व वॉर्डात दहा टक्के बेड आरक्षित असणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. धर्मादाय रुग्णालयांची आकस्मिक तपासणी करून रुग्णांना उपचार मिळत नसल्यास तात्काळ कार्यवाही करण्यासंदर्भात आमदार डॉ. मिलिंद माने, आ. अनिल सोले यांनी बैठकीत सूचना केली असता धर्मादाय आयुक्तांतर्फे रुग्णालयाची तपासणी करावी तसेच दिलेल्या दिशानिर्देशाचे काटेकोरपणे पालन न करणाऱ्या रुग्णालयांवर दंड आकारण्यासंदर्भात कारवाई करावी, धर्मादाय रुग्णालयांची संपूर्ण यादी तसेच उपलब्ध असलेल्या उपचारासंदर्भात संपूर्ण माहिती धर्मादाय आयुक्त व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावी, अशी सूचना यावेळी करण्यात आली. धर्मादाय रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेल्या उपचारासह आवश्यक माहितीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला असून दूरध्वनी क्रमांक २५६५६६८ यावर धर्मादाय रुग्णालयाची माहिती सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत उपलब्ध असेल, अशी माहिती जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी दिली. ही आहेत शहरातील धर्मादाय रुग्णालये धर्मादाय रुग्णालयांमध्ये उपलब्ध सुविधांसंदर्भात रुग्णालयाच्या दर्शनी भागात ठळकपणे बोर्ड लावून जनतेला माहिती उपलब्ध करून देण्यासंदर्भात सर्व रुग्णालयांना सूचना देण्यात आल्या आहेत. यामध्ये शहरातील विद्या शिक्षण प्रसारक मंडळाचे लता मंगेशकर हॉस्पिटल व एन.के.पी. साळवे वैद्यकीय महाविद्यालय, मातृसेवा संघ सीताबर्डी व महाल, जनता मॅटर्निटी होम हॉस्पिटल जरीपटका, सिम्स हॉस्पिटल बजाजनगर, राधाकृष्ण हॉस्पिटल वर्धमाननगर, आशा भवन सोशल हेल्थ सेंटर सिरसपेठ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज रिजनल कॅन्सर हॉस्पिटल, डॉ. दळवी स्मारक रुग्णालय गरोबा मैदान, सुश्रुत हॉस्पिटल रामदासपेठ, पक्वासा रुग्णालय हनुमाननगर, न्यू मेमोरियल सीताबर्डी, महात्मे आय बँक सोमलवाडा, खिदमद हॉस्पिटल शांतिनगर, तारिणी आयुर्वेदिक रुग्णालय शंकरपूर, स्वामी विवेकानंद मेडिकल मिशन खापरी, मिशन इंडिया हातगाव वाडी, स्वामी सीतारामजी हॉस्पिटल रामटेक, के.आर. पांडव आयुर्वेदिक कॉलेज, भाऊसाहेब मुळक आयुर्वेदिक कॉलेज, नागार्जुन मेडिकल ट्रस्ट रामकृष्णनगर, सेंट जोसेफ हॉस्पिटल येरला, चक्रपाणी पंचकर्म तसेच नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट आदी रुग्णालयांचा समावेश आहे.
धर्मादाय रुग्णालयांमध्ये गरिबांसाठी १० टक्के जागा बंधनकारक
By admin | Published: May 17, 2017 2:05 AM