लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एका खासगी इस्पितळातील डॉक्टरच्या निष्काळजीमुळे दहा वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याचे प्रकरण सोमवारी उघडकीस आले आहे.
टिमकी, दादरी पूल परिसरातील निवासी महेंद्र मौंदेकर यांचा दहा वर्षीय मुलगा निश्चल महेंद्र मौंदेकर याला दोन महिन्यांपूर्वी मुंगसाने चावा घेतला होता. नातेवाइकांनी त्याला शांती नगर घाटजवळील एका खासगी डॉक्टरांकडे उपचारासाठी घेऊन गेले. या दोन महिन्याच्या उपचारात डॉक्टरने मुलाला कधीच इंजेक्शन दिले नाही. याबाबत डॉक्टरला विचारले असता, इंजेक्शनची गरज नसल्याचे डॉक्टर म्हणाल्याचे महेंद्र मौंदेकर यांनी सांगितले. सोमवारी अचानक मुलाची प्रकृती बिघडली. तो रक्ताच्या उलट्या करू लागला. पाण्याला घाबरून तो वेदनेने विव्हळत होता. त्यामुळे त्याला दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास मेडिकलमध्ये आणण्यात आले. मुलाला मेडिकलच्या वार्ड क्रमांक ३८ मध्ये उपचारासाठी भरती करण्यात आले; परंतु मुलाची प्रकृती आणखीनच गंभीर झाली आणि संध्याकाळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
डॉक्टरने ॲण्टी रेबिज वॅक्सिन दिलीच नाही
महेंद्र मौंदेकर यांनी डॉक्टरांच्या निष्काळजीमुळे मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. मेडिकलच्या डॉक्टरांनी सांगितल्यानुसार मुलाच्या शरिरात विष पसरले होते. त्याला ॲण्टी रेबिज वॅक्सिन देणे गरजेचे होते. जंगली जंतूंनी चावा घेतल्यास ॲण्टी रेबिज वॅक्सिन देणे गरजेचे असल्याचे मेडिकलच्या चिकित्सा सूत्रांनी सांगितले. मुलाला ही वॅक्सिन मिळाली नसल्याने रेबिजमुळे त्याच्या शरिरात विषाचा प्रादुर्भाव झाला आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झाला.