नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने भंडारा जिल्ह्यातील अनैसर्गिक लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात आरोपीचे अपील फेटाळून त्याची १० वर्षे सश्रम कारावास व एकूण सहा हजार रुपये दंडाची शिक्षा कायम ठेवली. न्यायमूर्ती विनय जोशी यांनी हा निर्णय दिला.
सुनील ऊर्फ पवन्या शामराव मेश्राम (३८) असे आरोपीचे नाव असून तो भागडी, ता. लाखांदूर येथील रहिवासी आहे. ही घटना २५ मार्च २०१६ रोजी सकाळी ११ च्या सुमारास घडली. त्यावेळी पीडित मुलगा १० वर्षे वयाचा होता. तो शेतातून घरी परत येत असताना आरोपीने मासेमारी करण्याचे प्रलोभन दाखवून त्याला नदीजवळ नेले. दरम्यान, आरोपीने त्याच्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर मुलाने आईला आरोपीच्या कुकृत्याची माहिती दिली. त्यामुळे आरोपीविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती. ३१ ऑगस्ट २०१८ रोजी विशेष सत्र न्यायालयाने आरोपीला संबंधित शिक्षा सुनावली. त्या निर्णयाविरुद्ध आराेपीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने पीडित मुलाचे बयान व वैद्यकीय पुरावे लक्षात घेता आरोपीविरुद्धचा गुन्हा सिद्ध होत असल्याचा निष्कर्ष नोंदवून सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला.