निशांत वानखेडे, नागपूरनागपूर : माेफत शिक्षणाचा अधिकार कायद्याअंतर्गत इंग्रजी शाळांमध्ये मुलांच्या प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव करताना पालकांची चांगलीच दमछाक हाेत आहे. यात भाड्याने राहणाऱ्या पालकांसाठी भाडेकरार प्रमाणपत्र फास ठरला आहे. आरटीई अंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वीचा व ११ महिन्याचा भाडेकरार पालकांना सादर करायचा आहे. अनेक पालकांकडे हे प्रमाणपत्र नसल्याने धावपळ सुरू आहे. मात्र ३१ जुलै ही प्रमाणपत्र सादर करण्याची अंतिम मुदत असल्याने शेकडाे पालकांची हिरमाेड हाेण्याची भीती आहे.
आरटीई कायद्याअंतर्गत इंग्रजी माध्यमांच्या खाजगी शाळांमध्ये २५ टक्के जागांवर माेफत प्रवेश देण्यात येताे. यासाठी काही महिन्यांपासून पालकांची कागदपत्रांची जमवाजमव करण्यासह अनेक गाेष्टींसाठी मेहनत सुरू आहे. राज्य सरकारच्या नव्या नियमांवर शाळा संचालकांनी आक्षेप घेतल्यानंतर न्यायालयीन प्रक्रियेमुळे प्रवेश प्रक्रिया रखडली हाेती. २०२४-२५ शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानंतरही ताेडगा निघाला नसल्याने पालकांमध्ये मुलांच्या शाळा प्रवेशाचा प्रश्न निर्माण झाला. अशात न्यायालयाच्या निर्णयानंतर पुन्हा प्रक्रिया सुरू झाली.
अशात कागदपत्रांसाठी पुन्हा पालकांची दगदग वाढली असून आर्थिक पुरावा, रहिवासी पुरावा सादर करताना पालकांची दमछाक हाेत आहे. शहरात भाड्याने राहणाऱ्या पालकांची निराशा हाेत आहे. त्यांना अर्ज करण्यापूर्वीचे भाडेकरार प्रमाणपत्र सादर करायचे हाेते. मात्र अनेक पालकांनी हा भाडेकरार केलाच नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पाल्यांचा ड्रा लागला असतानाही त्यांचे अर्ज रद्द हाेण्याची भीती आहे. नुकतेच शंभरावर पालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर जिल्हा परिषद सीईओ यांच्याकडे निवेदन सादर करून भाडेकरार पुराव्याची अट रद्द करण्याची किंवा काही अवधी देण्याची मागणी केली आहे.
अर्ज करताना अटीची माहिती नसल्याचे कारण
दरम्यान अर्ज करताना भाडेकरार प्रमाणपत्राची माहिती नसल्याने पालकांनी सांगितले. यापूर्वी अशाप्रकारची अट नसल्याचे काही पालकांनी सांगितले. यावर्षीपासून ही अट लावण्यात आली पण त्याची स्पष्ट माहिती नमूद न केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मात्र शासकीय परिपत्रकात सर्व अटींची माहिती नमूद असून पालक ते पूर्णपणे वाचत नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
६६०० जागा, २०,००० अर्जशिक्षण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्या आलेल्या अर्जाच्या कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे. नागपूर जिल्ह्यात आरटीईच्या ६६४८ जागा असून त्यासाठी २०,३४३ अर्ज प्राप्त झाले आहेत. लवकरच कागदपत्र पडताळणी करून प्रवेश यादी जारी करण्यात येईल, असे सांगण्यात आले.