लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राजकारणावर प्रभावीपणे भाष्य करणारी ऐतिहासिक कलाकृती म्हणून गेल्या ४० वर्षात ‘सिंहासन’ या चित्रपटाचा उल्लेख केला जातो. मात्र दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांना हा राजकारणावर नाही तर माणसांच्या प्रवृत्तीवर भाष्य करणारा सिनेमा असल्याचे वाटते. त्या काळच्या परिस्थितीला धरून या चित्रपटाची निर्मिती केली होती. काळ आणि परिस्थिती बदलली तरी नव्या पिढीच्या प्रेक्षकांना त्यातील पात्र आजच्या परिस्थितीशी साधर्म्य साधणारी वाटतात. कारण परिस्थिती बदलली तरी प्रवृत्ती आजही तीच असल्याने हा सिनेमा वर्तमान, पुढे ऐतिहासिक व आज कालातीत ठरल्याचे मनोगत त्यांनी व्यक्त केले.आॅरेंज सिटी कल्चरल फाऊंडेशन, नागपूर महापालिका, सप्तक आणि विदर्भ साहित्य संघ यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेल्या मराठी चित्रपटांचा महोत्सव कवी कुलगुरू कालिदास आॅडिटोरियम, पर्सिस्टंट सिस्टीम्स, आयटी पार्क, गायत्रीनगर येथे आयोजित करण्यात आला आहे. शनिवारी ‘सिंहासन’ व ‘मुक्ता’ हे दोन चित्रपट प्रदर्शित झाले. ‘सिंहासन’च्या शोनंतर यावर डॉ. पटेल, ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक सतीय आळेकर व समर नखाते यांनी चर्चा केली. यावेळी डॉ. जब्बार पटेल यांनी चित्रपटाच्या निर्मितीच्या आठवणी सांगितल्या. त्यांनी सांगितले की, यात राजकारणाची वाईट बाजू मांडल्याच अंदाज अनेकजण बांधतात. मात्र राजकारण्यांना कशा परिस्थितीचा सामना करावा लागतो, यावर आहे. यातील प्रत्येकच व्यक्ती लोकांचे भले करण्याच्या उद्देशाने राजकारणात येते. मात्र पुढे सामाजिक, जातीय, धार्मिक व आर्थिक समूहांच्या प्रभावामुळे ते या राजकारणात गुंतत जातात. वास्तविक प्रत्येक क्षेत्रात हीच प्रवृत्ती पहावयास मिळते. त्यामुळे चित्रपट पाहणारे प्रेक्षक प्रत्येक पात्रांचे संदर्भ बदलतात आणि वर्तमानाशी जोडतात. आजच्या समाजातील डाव्या आणि उजव्या विचारधारांची माणसे त्याचेच प्रतीक असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. कायम माणसांच्या प्रवृत्ती वाचणाऱ्या विजय तेंडूलकर यांच्या लेखनाने या चित्रपटाला वेगळी उंची दिल्याचे मनोगत त्यांनी व्यक्त केले. त्यांनी लेखक अरुण साधू यांच्या लेखनाचाही उल्लेख केला.यावेळी चर्चेत मनोगत व्यक्त करताना सतीश आळेकर म्हणाले, सर्व पात्र दुर्योधन (व्हिलेन) वाटावी, असा चित्रपट असूनही गेल्या ४० वर्षापासून सिंहासनचा प्रभाव प्रेक्षकांवर आहे, हे वैशिष्टपूर्ण आहे. कारण तांत्रिक बाबतीत दोष असतीलही, मात्र दिग्दर्शकाची, लेखनाची व कलावंतांच्या सच्च्या संवेदनांमुळे तो आजही वर्तमानाशी जुळलेला वाटतो.या संवेदनांमुळे हा डॉ. जब्बार पटेल यांचे इतर चित्रपट सिनेमांच्या अभ्यासात रेफरन्स पॉर्इंट ठरले असून हे त्यांनी मागे ठेवलेलं संचित असल्याचा गौरव त्यांनी केला. समर नखाते यांनी राजकीयपणाच्या सर्व छटांचा या चित्रपटात अंतर्भाव असल्याचे मनोगत व्यक्त केले. ही माणूस आणि व्यवस्थेतील प्रवृत्तीची वास्तवदर्शी कलाकृती आहे. कदाचित माणसांच्या वेगवेगळ्या कप्प्यांना जोडण्याचे सम्यक भान तेंडुलकरांच्या लेखनात असल्याचे ते म्हणाले.साडेचार लाखाच्या बजेटमध्ये सिनेमा बनविताना मंत्रालय व मंत्र्यांच्या बंगल्यामधील चित्रीकरण तसेच तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार, यशवंतराव चव्हाण यांच्या आठवणी डॉ. पटेल यांनी यावेळी नमूद केल्या. सोबतच थिएटर व इतर गोष्टींसाठी करावा लागलेला संघर्षही त्यांनी मांडला. सिंहासननंतर मुक्ता या चित्रपटाचे प्रदर्शन झाले व त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या पारोमिता गोस्वामी यांच्याशी संवाद साधण्यात आला.महोत्सवाच्या उद््घाटनप्रसंगी आॅरेंज सिटी फाऊंडेशनचे डॉ. चंद्रशेखर मेश्राम, मनपाचे उपायुक्त रवींद्र देवतळे, जिल्हा परिषदेचे सीईओ संजय यादव प्रामुख्याने उपस्थित होते. डॉ. सुधीर भावे यांनी संचालन केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर आजया चित्रपट महोत्सवात रविवारी डॉ. जब्बार पटेल यांच्या ‘जैत रे जैत’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ व ‘इंडियन थिएटर’ या तीन चित्रपटांचे प्रदर्शन होणार आहे. यादरम्यान साहित्यिक डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी व अजेय गंपावार यांचा संवाद कार्यक्रम होईल.