सर्व प्रस्तावांना मंजुरी : महामार्ग प्राधिकरणाची तयारी पूर्णनागपूर : वर्धा रोडवरील चिचभुवन ‘आरओबी’शी संबंधित सर्व प्रस्तावांना मंजुरी मिळाली आहे. यात रेल्वेला पाठविण्यात आलेल्या डिझाईनचा समावेश आहे. यामुळे या महिन्यातच ‘आरओबी’च्या बांधकामासाठी निविदा मागविल्या जातील. केंद्रात नवीन शासन आल्यानंतर चिचभुवन ‘आरओबी’ची जबाबदारी महामार्ग प्राधिकरणला देण्यात आली. यानंतर ‘आरओबी’चे डिझाईनच मंजूर होण्यासाठी दीर्घ काळ लागला. रेल्वेला दोन-तीन डिझाईन पाठविल्यानंतर आता एका खांबाचा समावेश असलेले डिझाईन मंजूर झाले आहे. अन्य डिझाईनसाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणची मंजुरी घ्यायची होती. परंतु, सध्याच्या डिझाईनमध्ये विमानतळ प्राधिकरणाच्या मंजुरीची गरज नाही. मंजूर डिझाईननुसार सध्याच्या दोनपदरी पुलाला लागूनच नवीन दोनपदरी पुल बांधण्यात येईल. महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प व्यवस्थापक श्रीराम मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पावसाळा संपताच कामाला सुरुवात होईल. (प्रतिनिधी)रेसिडेन्सी रोड उड्डाण पुलाला मंजुरीसदर येथील रेसिडेन्सी रोडवर प्रस्तावित उड्डाण पुलालाही मंजुरी मिळाली आहे. या उड्डाण पुलासाठीसुद्धा याच महिन्यात निविदा मागविण्यात येतील. हा पूल गेल्या १० वर्षांपासून प्रस्तावांतच अडला होता. सुरुवातीला हा पूल चारपदरी बांधण्याचे ठरले होते. परंतु, आता तीन पदरीच पूल बांधण्यात येणार आहे. लिबर्टी चित्रपटगृह ते छावणीपर्यंतचा रोड अरुंद असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. महामार्ग प्राधिकरणने केलेल्या नवीन सर्वेक्षणानुसार या पुलाची लांबी सुमारे ३ किलोमीटर राहील. हा पुल झिरो माईल ते पागलखाना चौकापर्यंत बांधण्यात येणार आहे. हा शहरातील सर्वात लांब पूल असेल.
चिचभुवन ‘आरओबी’ची निविदा लवकरच
By admin | Published: June 13, 2016 3:13 AM