लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘कोरोना’ची स्थिती लक्षात घेता हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत घेण्याचा निर्णय विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीने मंगळवारी घेतला. डिसेंबरमध्ये शहरावर भार वाढण्याचा धोका होता, मात्र यामुळे नागपूरला मोठा दिलासा मिळाला आहे. सोबतच हिवाळी अधिवेशनासाठी जारी करण्यात आलेल्या ४८ कोटी ८० कोटी रुपयांच्या निविदा रद्द करण्याचा निर्णय करण्यात आला आहे. बुधवारी याबाबत अधिकृत घोषणा होईल.
नागपुरात ७ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन घेण्यास विरोध होत होता. बाहेरुन लोक आल्याने नागपुरात संसर्ग वाढण्याचा धोका वर्तविण्यात येत होता. शहरात दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने आरोग्य यंत्रणादेखील यासाठी अनुकूल नव्हती. सार्वजनिक बांधकाम विभागदेखील संभ्रमाच्या स्थितीत होता. विभागाने तयारीसाठी ५४ कोटी ६४ लाख रुपयांच्या कामांचे अंदाजपत्रक विधिमंडळाला पाठविले होते. जवळपास ४८ कोटी ८० लाख रुपयांच्या निविदा जारी करण्यात आल्या होत्या. यात सिव्हील सोबतच इलेक्ट्रीकल कामांचादेखील समावेश होता. मात्र अधिवेशनाची अनिश्चितता लक्षात घेता ‘वर्कऑर्डर’जारी केले नव्हते.
रविभवनात कायम राहणार चाचणी केंद्र
रविभवन परिसरात कोरोना चाचणी केंद्र तसेच रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर्सच्या निवासाची सोय करण्यात आली आहे. अधिवेशन लक्षात घेता त्याला रिकामे करण्याची विनंती प्रशासनाने केली होती. मात्र आता हे केंद्र व निवासाची सोय कायम राहणार आहे. सोबतच आमदार निवासातील कोविड केअर सेंटर परत सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.