सैयद मोबीन
नागपूर : सुभाष रोडवरील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज क्रीडा संकुलातील जलतरण तलाव पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या तलावाच्या देखभालीसाठी २८ लाख रुपयाचे टेंडर जारी करण्यात आले होते. परंतु, यावर आतापर्यंत ७० लाख रुपये खर्च झाले असून काम मात्र, ९० ते ९५ टक्केच पूर्ण झाले आहे. कंत्राटदाराला अतिरिक्त रक्कम मिळाली नसल्यामुळे काम रखडले आहे
कोरोना संक्रमणामुळे शहरातील सर्व जलतरण तलाव बंद करण्यात आले होते. नवीन वर्षात तलाव सुरू होण्याची शक्यता आहे, पण देखभाल कार्य अपूर्ण असल्यामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज क्रीडा संकुलातील जलतरण तलाव सुरू होणार नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी, महानगरपालिकेचे लाखो रुपयाचे उत्पन्न प्रभावित होईल. हिवाळ्यामध्ये तलावाचे काम पूर्ण व्हायला पाहिजे. जेणेकरून उन्हाळ्यात तलाव सुरू करण्याची वेळ आल्यानंतर अडचण भासायला नको असे जाणकारांचे म्हणणे आहे.
फिल्टर प्लँन्टचे काम बाकी
जलतरण तलावाच्या फ्लोअर व फिल्टर प्लँन्टचे काम बाकी आहे. या तलावातून मनपाला महसूल मिळतो. त्यामुळे काम तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहे. काम पूर्ण झाल्यास उन्हाळ्यात तलाव सुरू करता येईल.
काम जवळपास पूर्ण
तलावावर आतापर्यंत ७० लाख रुपये खर्च झाले आहेत. काम जवळपास पूर्ण झाले आहे. कंत्राटदाराला आवश्यक रक्कम दिल्यानंतर थांबलेले कामही सुरू होईल. मनपाने याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. या तलावातून मनपाला वर्षाला २० ते २२ लाख रुपयाचे उत्पन्न मिळू शकते.
----- प्रमोद चिखले, क्रीडा सभापती, मनपा.