नागपुरातील कॉंग्रेसच्या संकल्प मेळाव्यात खदखदच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 12:05 AM2019-07-03T00:05:00+5:302019-07-03T00:05:02+5:30
लोकसभा निवडणुकांच्या अपयशातून कार्यकर्ते बाहेर पडावे व विधानसभेच्या निवडणुकांसाठी नव्याने सुरुवात व्हावी यासाठी नागपूर शहर कॉंग्रेस कमिटीतर्फे संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या मेळाव्यात नवीन दमाने लढण्यासाठी संकल्पाऐवजी कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यातील खदखदच जास्त प्रमाणात समोर आली. विविध नेत्यांनी भाषणातून आपल्या मनातील नाराजी मांडलीच, मात्र कार्यकर्त्यांनीदेखील उघडपणे आपल्यावर अन्याय होत असल्याची भावना बोलून दाखविली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकसभा निवडणुकांच्या अपयशातून कार्यकर्ते बाहेर पडावे व विधानसभेच्या निवडणुकांसाठी नव्याने सुरुवात व्हावी यासाठी नागपूर शहर कॉंग्रेस कमिटीतर्फे संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या मेळाव्यात नवीन दमाने लढण्यासाठी संकल्पाऐवजी कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यातील खदखदच जास्त प्रमाणात समोर आली. विविध नेत्यांनी भाषणातून आपल्या मनातील नाराजी मांडलीच, मात्र कार्यकर्त्यांनीदेखील उघडपणे आपल्यावर अन्याय होत असल्याची भावना बोलून दाखविली.
सिव्हील लाईन्स येथील वसंतराव देशपांडे सभागृह येथे मंगळवारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळावा सुरू झाल्यानंतरदेखील सभागृहातील ३० ते ४० टक्के खुर्च्या रिकाम्या होत्या. भाषण करताना बऱ्याच नेत्यांनी निवडणूक काळात कॉंग्रेसच्या प्रचार प्रणालीतील त्रुटींवर बोट ठेवले. माजी शहराध्यक्ष शेख हुसेन यांनी तर पूर्व नागपुरातील एका ब्लॉक अध्यक्षाने बूथ कार्यकर्त्यांच्या निधीमध्येच गडबड केल्याचा आरोप केला. यात त्यांनी कुणाचेही नाव घेतले नाही. मात्र पूर्व नागपुरातच काम पाहणाऱ्या एका महिला ब्लॉक अध्यक्षाने आक्रमक पवित्रा घेतला. हुसेन यांचे भाषण सुरू असतानाच ही महिला कार्यकर्त्यांमधून उठून संतापानेच थेट मंचावरच गेली व हुसेन यांना जाब विचारण्यास सुरुवात केली. हुसेन यांनीदेखील आक्रमक पवित्रा घेतला. अखेर शहराध्यक्ष विकास ठाकरे यांना हस्तक्षेप करावा लागला. मात्र यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता प्रामुख्याने दिसून आली.
या मेळाव्याला कॉंग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे, नागपूर लोकसभा मतदारसंघातील पराभूत उमेदवार नाना पटोले, रामटेक लोकसभा मतदारसंघातील पराभूत उमेदवार किशोर गजभिये, माजी खासदार विलास मुत्तेमवार, प्रदेश महासचिव डॉ.बबन तायवाडे, प्रदेश सचिव अतुल कोटेचा, उमाकांत अग्निहोत्री, माजी शहराध्यक्ष शेख हुसैन, अॅड. अभिजित वंजारी, गिरीश पांडव प्रामुख्याने उपस्थित होते.
तिकीट देताना कार्यकर्त्यांना विचारता का ?
उमाकांत अग्निहोत्री आपले मत मांडत असताना पक्ष ज्यांना तिकीट देईल त्यांच्या पाठीशी सर्व उभे राहू, असे प्रतिपादन केले. यावेळी सभागृहातील काही कार्यकर्ते उभे झाले. निवडणूकांमध्ये नेत्यांना तिकीट देत असताना कार्यकर्त्यांना विचारता का, असा संतप्त सवाल केला. इतर कार्यकर्त्यांनीदेखील हा मुद्दा उचलून धरला. अखेर अग्निहोत्री यांनी मिनीटभरातच आपले बोलणे आवरते घेतले.
वंजारी आक्रमक, स्वपक्षीयांवरच टीकास्त्र
अभिजित वंजारी यावेळी आक्रमक पवित्र्यात दिसून आले. कॉंग्रेस पक्षात बाहेरील लोकांना कुठलाही ‘स्कोप’ नाही हे निकालानंतर स्पष्ट झाले आहे. कॉंग्रेसच्या काही नेत्यांनी कार्यकर्त्यांना नेहमी गुलाम म्हणूनच वागणूक दिली आहे. त्यांनी केवळ आपलीच घरे भरली. अशा नेत्यांपासून पक्षाला वाचविले पाहिजे. स्थानिक नेत्यांमुळेच कॉंग्रेस बुडाली असा आरोप करत कुणाचेही नाव न घेता ‘टोपीबाज’ नेत्यांपासून पक्षाला मुक्त करा, अशी भावना त्यांनी मांडली.
शेळकेंची नेत्यांवर अप्रत्यक्ष टीका
मेळाव्यामध्ये नगरसेवक बंटी शेळके यांना बोलू द्या, अशी मागणी करत युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आरडाओरड सुरू केली. अखेर नाना पटोले यांच्याऐवजी शेळकेंना बोलण्याची संधी देण्यात आली. लोकसभा निवडणुकीत नेत्यांमुळे नव्हे तरुण कार्यकर्त्यांमुळे मतं मिळाली. कॉंग्रेसचे नेते तरुण कार्यकर्त्यांकडे नेहमीच दुर्लक्ष करतात. शहरातील सर्व ‘बूथ’वरून एक जण गृहित धरला तरी मेळाव्याला हजारहून अधिक जण सहज येऊ शकले असते. मात्र रिकाम्या खुर्च्या बरंच काही सांगत आहेत, असे म्हणत त्यांनी पक्षातीलच नेत्यांना चिमटा काढला. नगरसेवक मनोज सांगोळे हेदेखील भाषणासाठी उभे झाले. माझे भाषण फारसे चांगले नाही, त्यामुळे नाराज झाले तर बूट मारू नका, अशी विनंतीच त्यांनी कार्यकर्त्यांना केली.
संकल्प मेळाव्यातदेखील दुफळी
लोकसभा निवडणुकांनंतर कॉंग्रेसचे नेते मतभेद विसरून एकत्र येतील अशी अपेक्षा होती. मात्र या संकल्प मेळाव्याला नुकताच कॉंग्रेस कमेटीच्या ‘एससी सेल’चा राजीनामा दिलेले नितीन राऊत, अनिस अहमद, गेव्ह आवारी इत्यादी नेते अनुपस्थित होते.
पटोले, गजभिये करणार याचिका
दरम्यान, रामटेक लोकसभा मतदारसंघात आपला विजयच झाल्याचा दावा, किशोर गजभिये यांनी केला. ‘ईव्हीएम’च्या घोळामुळे तांत्रिक पराभव झाला आहे. यासंदर्भात न्यायालयात निवडणूक याचिका दाखल करणार असल्याची माहिती गजभिये व नाना पटोले यांनी दिली.
आंदोलनासाठी तयार रहा
यावेळी विकास ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहण्याची सूचना केली. प्रशासन व सरकारविरोधात रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवा व आंदोलनांसाठी सज्ज रहा असे ते म्हणाले. निवडणुकांसाठी सर्वांंनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. पदाधिकारी, कार्यकर्त्यांत मतभेद असले तर चालतील पण मनभेद नको. सर्वांनी कार्यकर्त्यांचा सन्मान केला पाहिजे, असे आवाहन डॉ.बबन तायवाडे यांनी केले. लोकसभेसाठी कार्यकर्त्यांनी मेहनत केली मात्र त्याला यश आले नाही. विधानसभेसाठी तरुण उमेदवारांना तिकीट दिले पाहिजे, असे प्रतिपादन अतुल कोटेचा यांनी केले.