लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : माटे चौकाजवळील मौजा परसोडी भागात गुरुवारी नागपूर सुधार प्रन्यासतर्फे अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात आली. पोलीस बंदोबस्तात झालेल्या या कारवाईच्या वेळी परिसरात तणाव निर्माण झाला होता. रहिवाशांनी नासुप्रच्या कारवाईला जोरदार विरोध केला तर पोलिसांनी घटनास्थळाजवळ जाण्यापासून नागरिकांना रोखले होते. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला.प्राप्त झालेल्या माहितीनुसार, परसोडीच्या खसरा क्रमांक ३०/१, ३१/१, ३७/२ आणि ३०/३ स्थित कैसाल गृह निर्माण सहकारी संस्थेतून निघणाऱ्या मार्गाच्या ९ मीटर रुंदीकरणाचा प्रस्ताव आहे. परंतु यात काही घरे येत होती. यासंदर्भात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. हे अतिक्रमण हटविण्याचे न्यायालयाने आदेश दिले होते. सकाळी १०.३० वाजता कार्यकारी अभियंता (पश्चिम) देवेंद्र गौर, विभागीय अधिकारी (पश्चिम) अविनाश बडगे यांच्या नेतृत्वात पथक प्रमुख वसंत कन्हेरे व पथक कारवाईसाठी पोहोचले. कारवाईला होणारा विरोध लक्षात घेता प्रतापनगर पोलीस ठाण्यातील ५० पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. पथकाने कारवाई सुरू करताच काही महिलांनी विरोध सुरू केला. परंतु पोलीस कर्मचाऱ्यांनी विरोध करणाºया दोन तरुणींनाच ताब्यात घेतले. दुपारपर्यंत तेथील तीन घरे जमीनदोस्त करण्यात आली.घर रिकामे करण्यास वेळ का दिला नाही, ठाकरे संतप्त दरम्यान, ही कारवाई होत असताना आमदार विकास ठाकरे यांना स्थानिक रहिवाशांनी माहिती दिली. ते घटनास्थळी पोहोचले. रहिवाशांनी आपले गाऱ्हाणे त्यांच्याकडे मांडले. घरातील सामान हटविण्यासाठीदेखील वेळ न देता कारवाई करण्यात आली. अगोदर कल्पना दिली असती तर कमीतकमी भाड्याचे घर तरी शोधता आले असते, असा आक्रोश महिलांनी केला. विकास ठाकरे यांनी नासुप्रच्या अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली. न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान करता येणार नाही. परंतु घर रिकामे करण्यासाठी अधिकाऱ्यांनी रहिवाशांना वेळ द्यायला हवा होता. एरवी मोठमोठ्या प्रतिष्ठानांवर कारवाईसाठी हात आखडता घेतला जातो. परंतु गरिबांच्या घरांवर बुलडोझर तत्परतेने चालविला जातो. माणुसकी दाखविली का गेली नाही, असा संतप्त सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला.
अतिक्रमण कारवाईमुळे नागपुरातील माटे चौकात तणाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2019 11:20 PM
माटे चौकाजवळील मौजा परसोडी भागात गुरुवारी नागपूर सुधार प्रन्यासतर्फे अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात आली. पोलीस बंदोबस्तात झालेल्या या कारवाईच्या वेळी परिसरात तणाव निर्माण झाला होता.
ठळक मुद्देरहिवाशांकडून नासुप्र कारवाईचा विरोध : पोलिसांनी घटनास्थळाजवळ जाण्यापासून नागरिकांना रोखले