लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर: विधिमंडळाच्या पहिल्याच दिवशी विविध मागण्यांसाठी दिव्यांगांनी विधानभवनावर मोर्चा काढला. हा मोर्चा पोलिसांनी टेकडी मार्गावर अडविला. परंतु मोर्चात सहभागी काही दिव्यांग बांधव पोलिसांना चकमा देऊन विधानभवनाकडे निघाले होते. तर टेकडी मार्गावर इतर दिव्यांगांना अडविताना एका पोलिसाने मोर्चातील महिलेशी धक्काबुक्की केल्याचा आरोप करून दिव्यांग बांधवांनी रोष व्यक्त करून टेकडी मार्गावरील दुसऱ्या बाजूची वाहतूक रोखून धरली. संबंधित पोलिस माफी मागेपर्यंत दिव्यांग बांधव शांत बसणार नाहीत, असा पवित्रा घेतला, रात्री उशिरापर्यंत दिव्यांग बांधव मोर्चास्थळी ठिय्या मांडून बसले होते.
दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांसाठी विदर्भ विकलांग संघर्ष समितीच्यावतीने हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी यशवंत स्टेडियम येथून मोर्चा काढण्यात आला. पोलिसांनी टेकडी मार्गावर हा मोर्चा अडविला. मोर्चात सहभागी विदर्भ विकलांग संघर्ष समितीचे अध्यक्ष गिरीधर भजभुजे, आशिष आमदरे, इरफान खान, राजन सिंग, मनोज राऊळ, उमेश गणवीर, नरेंद्र सौनडवले, रमेश ठाकरे, रोशन वंजारी, स्वी सुरस्कर, राजू राऊत, सुखदेव दुधलकर, राजेश खारेकर, देविदास मेश्राम, उषा लांबट, ज्योती बोरकर, उज्ज्वला खराबे यांनी दिव्यांगांच्या न्याय्य मागण्यांसाठी जोरदार नारेबाजी करीत कठडे तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना रोखून धरले. दिव्यांग बांधवांना रोखताना एका पोलिसाचा मोर्चातील महिलेला धक्का लागला. मात्र, संबंधित पोलिसाने जाणूनबुजून धक्काबुक्की केल्याचा आरोप करीत दिव्यांग बांधवांनी टेकडी मार्गावरील दुस्त्या बाजूची वाहतूक रोखून धरली. संबंधित पोलिस माफी मागेपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही, असा पवित्रा दिव्यांग बांधवांनी घेतला. यावेळी पोलिस उपायुक्त शशिकांत सातव, उपपोलिस अधीक्षक अतुल सबनीस, सहायक पोलिस आयुक्त नरेंद्र हिवरे, पोलिस उपायुक्त राहूल मदने, धंतोलीच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनामिका मिर्झापुरे यांच्यासह पोलिसांनी दिव्यांग बांधवांची समजूत घालून त्यांना विधानभवनाकडे जाण्यापासून रोखले. रात्री उशिरापर्यंत दिव्यांग बांधव आपल्या मागण्यांसाठी ठाण मांडून बसले होते.
मॉरिस कॉलेज चौकात वाहतूक विस्कळीत टेकडी मार्गावर पहिला मोर्चा आटोपल्यानंतर पोलिस दिव्यांग बांधवांच्या मोर्चाची वाट पाहत होते. परंतु अचानक टेकडी मार्गावरील दुसऱ्या बाजूने सुरू असलेल्या रस्त्याने दिव्यांगांचे नेते गिरीधर भजभुजे नारेबाजी करीत विधानभवनाकडे निघाले होते, ते मॉरिस कॉलेज चौकात थांबल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. परंतु टेकडी मार्गावर उपस्थित असलेले विशेष शाखेचे सहायक पोलिस आयुक्त नरेंद्र हिवरे यांनी तातडीने तेथे जाऊन दिव्यांग बांधवांची समजूत घातली व त्यांना टेकडी मार्गावर परत आणले. मॉरेस कॉलेज ते टेकडी रोड आणि सीताबर्डीकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली असती.