नागपूर : दोन गटात धुमसत असलेल्या वादाचे पर्यवसान जोरदार हाणामारीत झाले. लाठ्याकाठ्यांनी एकमेकांना मारहाण, गाड्यांची तोडफोड आणि दगडफेक करणाऱ्या आरोपींनी वाद सोडवायला गेलेल्या एका पोलिसालाही बेदम मारहाण केली. गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बजेरियात सोमवारी मध्यरात्रीनंतर घडलेल्या या घटनेमुळे मंगळवारी पहाटे २.३०पर्यंत प्रचंड तणावाचे वातावरण होते.अनुराग नंदकिशोर शुक्ला आणि शुभम श्रीवास्तव हे बजेरिया तेलीपुरा भागात राहतात. त्यांचा एकमेकांशी वाद आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्यात मोठी धुसफूस सुरू आहे. रविवारी रात्री त्यांच्यात हाणामारीही झाली. त्यामुळे वाद जास्तच चिघळला. सोमवारी मध्यरात्री दोन्ही गट आमनेसामने आले. त्यांनी तयारीनिशी एकमेकांवर हल्ला चढवला. शुभम श्रीवास्तव, प्रमोद यादव, इर्शाद आणि त्यांच्या २० ते ३० साथीदारांनी अनुराग शुक्ला (वय २९) यांच्या घरावर हल्ला चढवला. त्यांच्या वाहनांची तोडफोड केली. लॉजवरही दगडफेक केली आणि लॉजसमोर मांडलेल्या गणपती मंडळाचे साहित्य रस्त्यावर फेकून मोठे नुकसान केले. तर, आरोपी अनुराग शर्मा, अभिजित दांडेकर, आनंद स्वामी, रोहित शर्मा, राहुल शर्मा, राकेश शाहू, दिलीप शाहू, राजा शुक्ला आणि पवन पांडे तसेच त्यांच्या २० ते २५ साथीदारांनी श्रीवास्तव, शर्मा यांच्या घरावर हल्ला चढवून त्यांच्या वाहनांची तोडफोड केली. एका तरुणीलाही मारहाण केली. मध्यरात्री १२ पासून सुरू झालेली हाणामारी, हल्ला-प्रतिहल्ल्याचा प्रकार पहाटे २ पर्यंत सुरूच होता. त्यामुळे परिसरात प्रचंड तणाव तशीच दहशत निर्माण झाली होती. दोन्ही गटातील आरोपींची १० पेक्षा जास्त वाहने फोडली. अनेक जण जखमीही झाले. (प्रतिनिधी)पोलीस शिपायाला मारहाणया हाणामारीच्या घटनेची नियंत्रण कक्षाला एकाने माहिती दिली. नियंत्रण कक्षाने कळविलेल्या माहितीवरून गणेशपेठचा पोलीस ताफा वाद सोडवण्यासाठी गेला. मात्र, दोन्ही गटातील आरोपी ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. यावेळी बंदोबस्तावरील पोलीस कर्मचारी रोमेश दिलीपराव मेनेवार (वय ३०) हे भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडले असता अन्य पोलिसांसमोरच त्यांना आकाश शुक्ला, नंदकिशोर शुक्ला तसेच आणखी काही आरोपींनी काठी हिसकावून खाली पाडले. नंतर याच काठीने मेनेवार यांना बेदम मारहाण केली. त्यामुळे गणेशपेठ पोलिसांनी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागवून घेतला. उपरोक्त सर्व आरोपींविरुद्ध गैरकायद्याची मंडळी जमवून दंगा करणे, मारहाण करणे आदी कलमासोबतच पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला.
बजेरियात तणाव
By admin | Published: September 30, 2015 6:35 AM