लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: न्यायालयाच्या आदेशानुसार नागपूर महानगर पालिका आणि नासुप्रतर्फे अनधिकृत धार्मिक बांधकामे पाडण्याची कारवाई मागील काही दिवसांपासून सुरू आहे. सुरुवातीला नागरिकांनीही या कारवाईचे स्वागत केले. परंतु आता सार्वजनिक जागेवरील आणि वाहतुकीला कुठलाही त्रास होत नसलेली धार्मिक बांधकामेही पाडली असल्याने नागरिकांचा रोष वाढला आहे. त्यामुळे राजकीय पक्षही आता उघडपणे नागरिकांच्या बाजूने उभे झालेले दिसत आहेत. गुरुवारी सकाळी काचीपुरा आणि धरमपेठ परिसरात कारवाई करण्यास गेलेल्या अतिक्रमण हटाव पथकास नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले.नागरिकांचा विरोध लक्षात घेता अतिक्रमण पथकाला रिकाम्या हाती परत फिरावे लागले.काचीपुरा येथे शिवमंदिर आणि हनुमानाचे मंदिर पाडण्यासाठी गुरुवारी पथक येणार होते. याची माहिती नागरिकांना होताच त्यांनी या विरोधात मंदिरात भजन आणि महाप्रसादाचे आयोजन केले. त्यामुळे सकाळपासूनच शेकडो नागरिक मंदिर परिसरात जमले होते. कारवाई करण्यास आलेल्या पथकाला आणि पोलिसांना नागरिकांनी विरोध केला.यानंतर पथक धरमपेठ महाविद्यालयाच्या मागील भागात असलेले धार्मिक अतिक्रमण पाडण्यासाठी गेले. परंतु तेथेही शेकडो नागरिक आधीपासूनच रस्त्यावर उतरले होते. त्यांनी पथकाला विरोध केला. काही महिलांनी थाळ््या वाजवून निषेध करीत कारवाई पथकाला अटकाव केला.
नागपुरात धार्मिक स्थळे हटवण्यावरून तणाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2018 3:15 PM
न्यायालयाच्या आदेशानुसार नागपूर महानगर पालिका आणि नासुप्रतर्फे अनधिकृत धार्मिक बांधकामे पाडण्याची कारवाई मागील काही दिवसांपासून सुरू आहे. गुरुवारी सकाळी काचीपुरा आणि धरमपेठ परिसरात कारवाई करण्यास गेलेल्या अतिक्रमण हटाव पथकास नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले.
ठळक मुद्देनागरिकांनी रोखली कारवाईअतिक्रमण पथक रिकाम्या हाती परतले