लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाग्रस्त तरुणीचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त नातेवाईकांनी वर्धमाननगरातील रेडियन्स हॉस्पिटलमध्ये गोंधळ घातला.
सूत्रांच्या माहितीनुसार २३ वर्षीय तरुणीचा रेडियन्स इस्पितळात उपचार सुरू होता. तिचा गुरुवारी मृत्यू झाला. डॉक्टरांनी उपचाराचे बिल एक लाख ७५३ रुपये काढले. कुटुंबीयांनी आधीच ५० हजार रुपये जमा केले होते. उर्वरित रक्कम मागितली असता मृत तरुणीच्या शोकसंतप्त नातेवाईकांनी इस्पितळात गोंधळ घातला. योग्य उपचार न झाल्यामुळे तरुणीचा मृत्यू झाला, असा आरोप करून त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरले. गार्डलाही मारहाण केली. तरुणीचा मृतदेह ताब्यात घेऊन तो महापालिकेच्या वाहनातून नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे इस्पितळात तणाव निर्माण झाला. या प्रकाराची डॉ. बोपचे यांनी लकडगंज पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी संबंधितांविरुद्ध साथरोग प्रतिबंधक कायदा तसेच धमकी देऊन मारहाण केल्याचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.