लोकमत न्यूज नेटवर्क
नंदीग्राम : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्याचे मतदान गुरुवारी पार पडले. सायंकाळी ५ वाजेपर्यंत ३० जागांवर ८० टक्क्यांहून अधिक मतदान झाले होते. दिवसभरात नंदीग्रामसह काही जागांवर हिंसेच्या घटना घडल्याने तणाव होता. बऱ्याच ठिकाणी भाजप व तृणमूलच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी व दगडफेक झाली. मतदानादरम्यान झालेल्या या संग्रामामुळे राजकीय वातावरणदेखील तापले होते. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यपालांकडे धाव घेतली व निवडणूक आयोगाविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा दिला.
सकाळच्या सुमारास मतदानाला सुरुवात झाल्यापासून मतदारांची गर्दी दिसून येत होती. विशेषत: मुख्यमंत्री ममता बॅनर्जी लढत असलेल्या नंदीग्राम मतदारसंघात मतदान केंद्रांबाहेर मतदारांच्या रांगा होत्या. मतदानाशी संबंधित नियमांचा भंग होत असल्याचा दावा तृणमूलतर्फे करण्यात आला. नंदीग्राममध्येच निवडणूक आयोगाकडे तृणमूलकडून ६३ तक्रारी करण्यात आल्या. यात बूथ कॅप्चरिंग, बोगस मतदान यांसारख्या घटनांचा समावेश होता. मात्र निवडणूक आयोगाने तक्रारींची दखल घेतली नसल्याचा आरोप पक्षाकडून करण्यात आला.
ममता बॅनर्जी यांनी तक्रार करण्यासाठी थेट राज्यपाल जगदीश धनकड यांना फोन केला व भाजपकडून गैरप्रकार होत असल्याचा आरोप केला. धनकड यांनी टि्वट करून संबंधित बाबींबाबत निवडणूक अधिकाऱ्यांना कळविण्यात आल्याचे स्पष्ट केले. दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी आरोपांचे खंडन केले. मतदान जास्त झाल्याने तृणमूलला पराभव दिसायला लागला असल्याने ते अस्वस्थ झाले आहेत, असे ते म्हणाले.
ममतांच्या दौऱ्यादरम्यान हिंसा
नंदीग्राम विधानसभा क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या बोयल येथे ममता मतदानप्रक्रियेची पाहणी करण्यासाठी पोहोचल्या असताना भाजपच्या समर्थकांनी जय श्रीरामचे नारे लावणे सुरू केले. ममता यांनी एका बूथवर ठाण मांडले. त्यानंतर भाजपा व तृणमूलच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. दोन तास तेथे तणावाचे वातावरण होते.
शुभेंदू अधिकारींच्या कारवर हल्ला
ममता बॅनर्जी यांच्याविरोधात निवडणूक लढविणारे भाजपचे उमेदवार शुभेंदू अधिकारी बूथचा दौरा करत असताना त्यांच्या कारवर हल्ला करण्यात आला व दगडफेक करण्यात आली. सोबतच नंदीग्राममधील ताकापुरा, संतेगाबाडी येथेदेखील दगडफेक झाली. विविध ठिकाणी अधिकारी यांची गाडी थांबवून तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी घेराव केला. केशपूर विधानसभा क्षेत्रांतील भाजप उमेदवार तन्मय घोष यांच्या वाहनाचीदेखील तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली.
निवडणूक आयोगाविरोधात न्यायालयात जाणार
निवडणूक आयोगाने मतदानादरम्यान आमच्या तक्रारी गंभीरतेने घेतल्या नसल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला. या मुद्द्यावर आयोगाविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले. निवडणूक आयोग गृहमंत्री अमित शहा यांच्या इशाऱ्यावर काम करत असून, इतर राज्यांतून आलेले गुंड अडथळे निर्माण करत असल्याचा आरोप त्यांनी केला.