नागपूर - टेका नाका परिसरात सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्यावर कारवाईसाठी पोहचलेल्या पोलिसांना काही समाजकंटकांनी
घेराव घालून धमकावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे परिसरात काही वेळेसाठी प्रचंड तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, दंगा नियंत्रण पथक तसेच आजुबाजुच्या सहा पोलीस ठाण्यातील ताफा तिकडे धावला अन् त्यांनी दमदाटी करणाऱ्यांना पिटाळून लावले.
टेका नाका चिराग चाैकाजवळ अवैध कत्तलखाना असून तेथे गोवंशाचे मास पडून असल्याची माहिती कळताच गस्तीवर असलेले बीट मार्शल आणि पाचपावलीचे पोलीस शनिवारी दुपारी १ च्या सुमारास तिकडे पोहचले. पोलीस कारवाई करणार असल्याचे लक्षात आल्याने कत्तलखाना चालविणाऱ्यांनी जोरदार विरोध केला. त्यामुळे पोलिसांनी आरोपी मोहम्मद सलीम अब्दुल गनी कुरेशी, सलीम कुरेशीला ताब्यात घेतले. त्याला ठाण्यात नेणार असल्याचे पाहून गनीच्या साथीदारांनी कारवाईसाठी आलेल्या आठ ते १० पोलिसांना घेराव घालून दमदाटी सुरू केली. मोठा जमाव जमवून कारवाईचा विरोध करत त्यांनी घोषणाबाजी केली. त्यामुळे तेथे वातावरण तणावपूर्ण बनले. विरोध करणाऱ्यांची गर्दी वाढत असल्याचे लक्षात घेऊन पोलिसांनी नियंत्रण कक्षात माहिती देऊन अतिरिक्त मदत मागवून घेतली. काही वेळेतच तेथे पाचपावली, लकडगंज, कोतवाली, कपिलनगर आणि यशोधरानगर पोलिसांचा मोठा ताफा धडकला. दंगा नियंत्रण पथकही पोहचले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही तेथे धाव घेतली. त्यांनी गैरकायद्याची मंडळी जमवू पाहणाऱ्यांना पिटाळले.
----
मोठ्या प्रमाणात मांस जप्त
पोलिसांनी त्या ठिकाणाहून १५ गोवंश ताब्यात घेऊन त्यांना गोशाळेत पाठवले. तेथून मोठ्या प्रमाणात मांस जप्त करण्यात आले. कत्तलखान्यात सापडलेला सलीम कुरेशी आणि अन्य दोघांना चाैकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी वृत्त लिहिस्तोवर पोलिसांकडून कारवाईचे स्वरूप स्पष्ट झाले नव्हते.
----