नागपूर : मागील काही काळापासून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्यावर सातत्याने दडपशाहीचे आरोप होत आहेत. सोमवारी त्यांच्या वर्तणुकीने परत एकदा प्राधिकरण सदस्यांनी त्यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या. कुठल्याही चर्चेशिवाय केवळ दोनच मिनिटांत ‘सिनेट’ विसर्जित करण्यात आली. विद्यार्थी हिताच्या मुद्द्यांवर चर्चाच न होता अशा प्रकारे कुलगुरूंनी एकाधिकारशाही करीत निर्णय कसा घेतला, असा सवाल उपस्थित करीत ‘सिनेट’ सदस्यांनी मुख्य प्रशासकीय इमारत परिसरात आंदोलन केले. नाराज सदस्यांनी कुलगुरूंच्या वागणुकीबाबत राज्यपाल कार्यालयाकडेदेखील तक्रार केली आहे.
नागपूर विद्यापीठाची अर्थसंकल्पीय ‘सिनेट’ची सभा ११ मार्च रोजी तहकूब करण्यात आली होती व कार्यक्रमपत्रिकेतील उर्वरित मुद्द्यांवरील चर्चेसाठी सोमवारी सभा बोलविण्यात आली होती. सकाळी १० वाजता सभेला सुरुवात झाली. मर्यादित सदस्यांची उपस्थिती असताना आजवर कधीही सक्रिय नसलेले डॉ.दामोदर सातपुते यांनी अचानक सभा विसर्जित करण्याचा प्रस्ताव मांडला व डॉ.माहेश्वरी यांनी त्याला अनुमोदन दिले. त्यानंतर कुलगुरूंनी १०.०२ वाजता सभा विसर्जित होत असल्याची घोषणा केली.
सकाळी साडेदहा- अकरा वाजेपर्यंत बहुसंख्य सदस्य आल्यानंतर कोणत्याही स्पष्टीकरणाशिवाय सभा अचानक संपल्याचे पाहून त्यांना धक्काच बसला. कुलगुरू आणि प्र-कुलगुरू विद्यापीठाबाहेर गेल्याने संतप्त सदस्यांनी कुलसचिव डॉ.राजू हिवसे यांना घेराव घालून स्पष्टीकरण मागितले. जेव्हा ते त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देऊ शकले नाहीत, तेव्हा संतप्त सदस्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र लिहून बैठक पुन्हा बोलावण्याची विनंती केली. यादरम्यान सदस्य ठिय्या देऊन बसले होते.
९९ वर्षांतील प्रथमच घटना
नागपूर विद्यापीठाच्या स्थापनेला ९९ वर्षे झाले असून आजपर्यंत ‘सिनेट’ सदस्यांना एकही शब्द बोलू न देता सभा विसर्जित करण्याचा प्रकार पहिल्यांदाच घडला असल्याचा आरोप ‘सिनेट’ सदस्यांनी लावला. मागील काही काळापासून कुलगुरू सातत्याने हिटलरशाही करीत असून त्यांच्याकडून सार्वजनिक प्राधिकरणाला खाजगी स्वरूप देण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा दावा सदस्यांनी केला.
कुलगुरूंनादेखील घेराव
कुलगुरू दुपारी तीन वाजता कुलगुरू परत आल्यावर सदस्य त्यांच्या दालनात शिरले व सदस्यांच्या हक्कांवर गदा कशी आणली, यावर प्रश्न उपस्थित केले. कुलगुरूंनी माझा तो अधिकार असल्याची भूमिका घेतली. त्यामुळे कुलगुरू व सदस्यांमध्ये वादावादी झाली. कुलगुरूंनी लोकशाहीचा गळा आवळल्याचा आरोप सदस्यांनी केला. विशेष म्हणजे सातत्याने कुलगुरूंची पाठराखण करणाऱ्या सदस्यांनादेखील सोमवारी डॉ.चौधरी यांनी विश्वासात घेतले नाही. अभाविप व भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनीदेखील परिसरात नारेबाजी केली. सदस्यांच्या दबावानंतर एप्रिल महिन्यात परत बैठक बोलावू, असे आश्वासन कुलगुरूंनी दिले.
कुलगुरूंचा दावा, खाजगी चर्चा
‘सिनेट’ सदस्यांनी कुलगुरूंना घेराव घातला असताना प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधीदेखील त्यांच्या दालनात पोहोचले; परंतु सुरुवातीपासूनच प्रसारमाध्यमांचा दुस्वास करणाऱ्या कुलगुरूंनी खाजगी चर्चा सुरू असल्याचे सांगत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना तेथे बसू दिले नाही. मुळात सार्वजनिक विषयांवर चर्चा सुरू असताना तिला खाजगी असे संबोधण्याचा हक्क कुलगुरूंना आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.