नागपूर : एका तरुणाने भाजपच्या माजी प्रवक्ता नूपुर शर्मा यांच्या संदर्भात एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. मात्र, यावरून आकांडतांडव होणार हे लक्षात येताच त्याने कुटुंबीयांसह घर सोडून पलायन केले. दरम्यान संतापलेल्या लोकांनी त्याचे घर गाठले. यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्परता दाखवत तरुण राहत असलेल्या परिसराला रात्री सुरक्षेच्या दृष्टिकोनातून वेढा घातला आहे.
सोशल मीडियावर ही पोस्ट व्हायरल होताच खळबळ उडाली. दरम्यान काही लोक संबंधित पोस्टमुळे क्रोधित होऊन तरुणाच्या घरी पोहोचले. तोपर्यंत संपूर्ण कुटुंबीयांनी पलायन केले होते. पोस्टमुळे नाराज झालेल्या लोकांची पोलिसांनी समजूत घातली. तसेच घाबरून शहर सोडणाऱ्या तरुण व त्याच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून त्यांना सुरक्षेचे आश्वासन दिले. पोलिसांनी या परिसराला सुरक्षेचा वेढा दिला असून संपूर्ण घटनाक्रमावर नजर ठेवण्यात येत असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.