-स्थानिक नागरिकांची मनपा व पोलिसांकडे तक्रार
-प्रशासकीय मंजुरीसह बांधकाम करण्याची पोलिसांची तंबी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सदर भागातील भारत टॉकीज परिसरातील एका धार्मिक स्थळावर रविवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास बिल्डर जमावासह पोहोचल्याने वाद निर्माण झाला. स्थानिक लोकांच्या तक्रारीनुसार बिल्डरची माणसे काही दशकापूर्वीचे धार्मिक स्थळ तोडण्यासाठी आले होते. नागरिकांनी याची माहिती सदर पोलिसांना दिली.
घटनेची माहिती पसरताच थोड्याच वेळात घटनास्थळी नागरिकांची गर्दी होऊ लागली, परंतु पोलिसांनी परिस्थिती हाताळली. पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाचे फोटो काढून पंचनामा केला. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार भारत टॉकीज लगतच्या जागेवर काही दशकापासून असलेले धार्मिक स्थळाविषयी नागरिकांना आस्था आहे. बिल्डर किशोर रॉय यांनी टॉकीजची जागा खरेदी करून खोदकाम सुरू केले. यामुळे भाविक व नागरिक काठावरून ये-जा करतात. बिल्डरच्या बांधकामाला कुणाचा विरोध नाही. बिल्डरने खोदकाम करताना मनपाची भूमिगत ट्रंक लाईन क्षतीग्रस्त केली. ट्रंक लाईनचे दूषित पाणी बांधकामाच्या ठिकाणी साचले. त्यानंतर दोन वर्षे बांधकाम बंद होते. परंतु खड्ड्यात पाणी साचल्याने घाण वास व डासांमुळे आजूबाजूचे नागरिक त्रस्त आहेत. बिल्डरने आपल्या जागेत बांधकाम करण्याला आमचा विरोध नाही, परंतु धार्मिक स्थळ बिल्डरने खरेदी केलेल्या जागेत नाही. असे नागरिकांचे म्हणणे आहे. दोन वर्षांनंतर बिल्डरने २७ जूनला जमावासह पोहोचून धार्मिक स्थळाची सुरक्षा भिंत तोडण्याला सुरुवात केली. त्यानंतर परिसरातील नागरिक, माजी महापौर राजेश तांबे, नगरसेवक संजय बुर्रेवार, रज्जू भय्या, जयंत टेंभुर्णे आदी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी याची सूचना पोलिसांना दिली.
....
बिल्डरला बजावली नोटीस
संबंधित धार्मिक स्थळी बिल्डर जमावासह आल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. बिल्डर किशोर रॉय यांना कलम १४९ अंतर्गत नोटीस बजावल्याची माहिती सदर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष बकाल यांनी दिली. कायदेशीर दस्ताऐवज व आवश्यक प्रशासकीय मंजुरीनंतरच कामाला सुरूवात करा, अशी तंबी बिल्डरला दिली.
...
धार्मिक स्थळ बिल्डरच्या जागेत नाही
संबंधित धार्मिक स्थळ हे बिल्डरच्या जागेत नसल्याची माहिती राजेश तांबे यांनी दिली. धार्मिक स्थळ त्यांच्या जागेत असेल त्यांनी याचे दस्ताऐवज दाखवावेत. धार्मिक स्थळ टॉकीजच्या बांधकामापूर्वीचे आहे. बिल्डरच्या बांधकामाला विरोध नाही. बिल्डरने खोदकाम करताना मनपाची ट्रंक लाईन फोडली. रविवारी अचानक बाऊंसर व जमावासह पोहोचून धार्मिकस्थळ तोडण्याचा प्रयत्न केला. यानंतर नागरिकांनी नगरसेवक , महापौर दयाशंकर तिवारी व पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्याकडे तक्रार केली.
.....
काही नागरिक जबरदस्तीने अतिक्रमण करताहेत
बांधकामाच्या दृष्टीने ही जमीन खरेदी केली आहे. साफसफाईचे काम केले जात आहे. जमाव आणून धार्मिक स्थळ तोडण्याचा आरोप चुकीचा आहे. काही नागरिक बांधकामात आडकाठी आणून जबरदस्तीने अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे बिल्डर किशोर रॉय यांनी सांगितले.