लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या मंगळवारी झोन क्षेत्रातील बाबा फरीरदनगर लगतच्या बगदादीनगर येथे मनपा वा नासुप्रची मंजुरी न घेता अनधिकृत घरांचे बांधकाम करण्यात आले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार अनधिकृत बांधकाम तोडण्यासाठी मंगळवारी मनपाचे अतिक्रमण विरोधी पथक पोहचले असता नागरिकांनी कारवाईला विरोध केला. ७०० ते ८०० लोकांच्या जमावाने कारवाईला विरोध केल्याने येथे तणावाची स्थिती निर्माण झाली.कारवाईत अडथळा निर्माण झाला होता.सतरंजीपुरा बडी मस्जिद कमिटीची बगदादीनगर येथे १६ एकर जमीन आहे. या जागेवर २८८ प्लॉट पाडण्यात आले. मात्र कुठलीही परवानगी न घेता यातील १३४ प्लॉटवर लोकांनी घरे उभारली.याच परिसरात साहिल सय्यद याने बंगल्याचे अनधिकृत बांधकाम केले होते. मनपाच्या पथकाने गेल्या महिन्यात त्याचे बांधकाम पाडले होते. या कारवाईनंतर १३४ घरांचे बांधकाम अनधिकृत असल्याचे निदर्शनास आले होते. अनधिकृत बांधकाम तोडण्यासाठी मनपाचे पथक पोहचले असता येथील नागरिकांनी या कारवाईला विरोध केला. यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली. येथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
बगदादीनगर येथे अनधिकृत बांधकाम हटविण्यावरून तणाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 8:31 PM