नागपूर : दसऱ्याच्या मुहुर्तावर झेंडू फुलांनी बाजारपेठ सजली असून वाढत्या मागणीसह फुलांचे दरही चांगलेच वधारल्याचे दिसून येत आहे.
नवरात्र, दसरा आणि दिवाळीच्या निमित्ताने दरवर्षी झेंडुंच्या फुलांना मोठी मागणी असते. दसरा-दिवाळी हे दोन्ही सण १०-१५ दिवसांच्या अंतरावर येत असून मोठ्या उत्साहाने दोन्ही सण साजरे केले जातात. मात्र, कोरोनासंकाटामुळे गेल्या २ वर्षापासून सणावार, उत्सवावर निर्बंध आले. मात्र, थोडे थोडके का होईना सर्वजण आपआपल्या परिने उत्सव साजरे करत आहेत.
दसरा दिवाळी निमित्त यंदा बाजारपेठ खुलली असून नागरिकांचीही खरेदीसाठी चांगलीच गर्दी दिसत आहे. दसरा सणात झेंडूच्या फुलाचे विशेष महत्व असून मागणी वाढल्याने फुलांना चांगला दर मिळत आहे. आज बाजारपेठेत ५० हजार फुलांची आवक झाली असून ठोक बाजारात ५० ते ६० रुपये प्रतिकीलोच्या दराने फुलांची विक्री होत आहे. तर, किरकोळ बाजारात १६० ते १७० रुपये दर आहे. उद्या सणानिमित्त फुलांच्या किंमतीत आणखी वाढ होणार असून ठोक बाजारात प्रतिकिलो १०० रुपये पर्यंतची किंमत राहू शकते.
यंदा, अतिवृष्टीचा परिणाम जसा इतर पीकांवर झाला तसाच झेंडूच्या उत्पादनावरही झाला. पावसामुळे झेंडूच्या फुलांचे नुकसान झाले आहे. मात्र, असे असले तरी आवक ही सरासरी एवढीच राहिलेली आहे. त्यामुळे, दसरा-दिवाळीच्या या उत्सवात झेंडुच्या फुलांचा चांगला भावही चांगलाच वधारल्याचे चित्र आहे.