नागपूर : कोरोनामुळे शिक्षण क्षेत्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तब्बल ६ महिने शाळाच उघडल्या नाही. आता ९ ते १२वीच्या शाळा सुरू झाल्या आहेत. परीक्षेपर्यंत मिळालेला वेळात केवळ अभ्यासक्रम पूर्ण होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करणे अवघड जाणार असल्याने अनेक विद्यार्थ्यांची किंबहुना पालकांचीदेखील यंदा परीक्षा देण्याची मानसिकता नाही. शहरातील काही शाळांचा आढावा घेतला असता, पालकांकडूनच शिक्षकांना सांगण्यात आले की यंदा परीक्षेचे राहूच द्या.
दहावी आणि बारावी हे वर्ष विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. या परीक्षांमध्ये चांगले स्कोअर केल्यानंतर ते आपल्या भविष्याची दिशा ठरवू शकतात. कोरोनामुळे २०२०-२१ हे शैक्षणिक वर्ष विद्यार्थ्यांसाठी नुकसानदायकच ठरले आहे. शाळा, शिकवणीवर्ग बंद असल्याने, अभ्यासाचे वातावरण विद्यार्थ्यांना यंदा मिळाले नाही. ग्रामीण भागात तर ऑक्टोबरपर्यंत कुठल्याच हालचाली नव्हत्या. ऑक्टोबरनंतर ग्रामीणमध्ये काही शाळांनी ऑनलाइन शिक्षण सुरू केले. पण तांत्रिक अडचणीमुळे अध्यापन आणि अध्ययन शक्य झाले नाही. १४ डिसेंबरपासून ग्रामीणमध्ये शाळा सुरू झाल्या खऱ्या, मात्र ५० टक्के विद्यार्थी अजूनही शाळेत आलेले नाही. शहरातील काही शाळांनी ऑनलाइनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे अभ्यासक्रम पूर्ण केले. पण ऑनलाइनद्वारे विद्यार्थ्यांचा अपेक्षित अभ्यास झाला नाही. महापालिकेच्या हद्दीतील काही शाळा ४ जानेवारीपासून सुरू झाल्या. २० दिवसांत शाळेतील उपस्थिती लक्षात घेता २० ते २५ टक्केच विद्यार्थी शाळेत उपस्थित राहत आहे. यंदा विद्यार्थ्यांची परीक्षेची तयारीच झाली नाही आणि शिल्लक असलेल्या वेळेत तयारी पूर्ण होणे शक्यच नाही.
त्यामुळे यंदा परीक्षेतून ड्रॉप घेऊन, पुढच्या वर्षी परीक्षेची तयारी करावी, अशी विद्यार्थी व पालकांची मानसिकता आहे. नाहीतरी वर्ष गेलेलेच आहे, उरलेल्या वेळेत विद्यार्थी काय साध्य करतील, अशी पालकांचीही मानसिकता आहे. शहरातील काही शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक स्वत: येऊन यंदा ड्रॉप दिला तरी चालेल, असे सांगून परीक्षेचा फॉर्मही भरत नाही.
- बोर्डाने तब्बल तिसऱ्यांदा दिली मुदतवाढ
२०२१ मध्ये होणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने पुन्हा मुदतवाढ दिली आहे. सुरुवातीला १५ डिसेंबर ते ४ जानेवारी परीक्षेचे अर्ज भरण्याचा कालावधी दिला होता. त्यानंतर ५ जानेवारी ते १८ जानेवारी अशी मुदतवाढ दिली. आता पुन्हा १९ जानेवारी ते ६ डिसेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना परीक्षेचे अर्ज भरण्याची संधी बोर्डाने उपलब्ध करून दिली आहे. बोर्ड वारंवार देत असलेल्या मुदतवाढीवरून निश्चित अपेक्षित विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ट झाले नसल्याचे दिसते आहे.