नागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र १२ वी व १० परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खासगीरित्या फॉर्म नं. १७ भरुन परीक्षेस विलंब आणि अतिविलंब शुल्क भरुन प्रविष्ठ होण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. अशा विद्यार्थ्यांना आता ३१ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. पूर्वी ही मुदत २४ ऑगस्ट पर्यंतच होती.
१० वीसाठी http://form17.mh-ssc.ac.in आणि इयत्ता १२ वीसाठी http://form17.mh-hsc.ac.in या संकेतस्थळावर अर्ज करता येतील. दिव्यांग विद्यार्थ्यांना खासगीरित्या प्रविष्ठ व्हायचे असल्यास त्यांनी त्यांच्या दिव्यांगत्वाचे जिल्हा शल्य चिकित्सकांच्या किंवा प्राधिकृत केलेल्या हॉस्पिटलच्या प्रमाणपत्राची छायाप्रत प्रमाणित करुन अर्जासोबत सादर करावी व आवश्यकतेनुसार विभागीय मंडळ, कनिष्ठ महाविद्यालय किंवा संपर्क केंद्र यांच्याकडून माहिती प्राप्त करुन घ्यावी.
ऑनलाईन अर्ज भरताना कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास कार्यालयीन वेळेत ०२०-२५७०५२०७/२५७०५२०८ या दूरध्वनी क्रमांकावर तर इतर बाबींसाठी २५७०५३७१ या क्रमांकावर संपर्क साधावा. विद्यार्थ्यांना नावनोंदणी प्रमाणपत्र ऑनलाईन देण्यात येणार आहे. याची नोंद घ्यावी. तसेच विद्यार्थ्यांनी अर्जासोबत छाननीसाठी दिलेली मूळ कागदपत्रे संपर्क केंद्र किंवा कनिष्ठ महाविद्यालयाकडून निर्धारित कालावधीनंतर परत घेवून जाण्याची दक्षता घ्यावी. खासगी विद्यार्थी नावनोंदणी करण्यासाठी अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर असून यानंतर मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.