नागपूर : हिंगणा औद्योगीक वसाहतीतील स्पेस वूड फर्निचर कंपनीला मंगळवारी सायंकाळी 4.30 च्या सुमारास भीषण आग लागली. या आगीमुळे कंपनीचे लाखोंचे नुकसान झाले असून अग्निशमन दलाचे जवान आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहे. स्पेसवूड कंपनीत आज सायंकाळी 4.30 च्या सुमारास अचानक आगीचा भडका उडाल्यामुळे एकच गोंधळ उडाला. कंपनीच्या प्रशासनाने पोलिस आणि अग्निशमन दलाला लगेच माहिती दिली. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाच्या पथकांनी धाव घेऊन आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
आगीनं लवकरच रौद्र रूप धारण केल्याने लांब अंतरावरून आगीचे आणि धुराचे लोट दिसत होते. त्यामुळे हिंगणा एमआयडीसी परिसरातील शेकड्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. आगीच्या घटनेमुळे वृत्त लिहिस्तोवर कुणालाही दुखापत झालेली नाही मात्र लाखोंचे फर्निचर तसेच कच्चामाल आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. कंपनीत खर्डे तसेच लाकुड मोठ्या प्रमाणात असल्याने चोहोबाजूने आगीचे लोळ उठत होते. विविध बंबाच्या सहाय्याने अग्निशमन दलाचे जवान आग विझविण्यासाठी जिकरीचे प्रयत्न करीत होते. आगीने आजूबाजूच्या कंपन्यांना आपल्या कवेत घेऊ नये यासाठीही अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्न चालविले होते.