नागपूर : अल्पवयीन मुलांना सोबत घेऊन एका विद्यार्थ्याने त्याच्याच महाविद्यालयातील एका मित्राची हत्या केली. प्रेमप्रकरणातून ही हत्या झाली असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
सक्षम कैलास तिनकर (१७, शिरूळ, हिंगणा) असे मृतक विद्यार्थ्याचे नाव आहे तर सौरभ उर्फ बादशाह बस्ताराम पंधराम (१९, चिंचभुवन, राजाराम नगर) हा आरोपी आहे. हे दोघेही मित्र होते. मात्र अगोदर एका मुलीवरून दोघांमध्ये वाद झाला व त्यानंतर पैशांच्या कारणावरून त्यांच्यात भांडण झाले. तेव्हापासून दोघेही एकमेकांचा प्रचंड राग करत होते. त्यांच्या काही मित्रांनी दिलजमाई करण्याचा प्रयत्न केला होता.
सोमवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास बादशाहने सक्षमला फोन करून सेटलमेंट करण्यासाठी डोंगरगाव परिसरात बोलविले. सक्षम त्याच्या एका मित्राला सोबत घेऊन तेथे गेला. तेथे त्यांच्यात सुरुवातीला सेटरमेंटबाबत बोलणे झाले. मात्र बादशाह व त्याच्यासोबत आलेल्या अल्पवयीन मुलांनी अगोदर सक्षमच्या मित्राशी वाद घातला. त्यानंतर त्यांनी सक्षमकडे मोर्चा वळवला व त्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
सक्षमने बादशाहच्या कानशीलात लगावली व त्यानंतर सर्व आरोपी चिडले. त्यांनी सक्षमला बेदम मारहाण केली व बादशाहने कटर तसेच चाकूने सक्षमवर सपासप वार केले. यात सक्षम गंभीर जखमी झाला. त्यानंतर आरोपी फरार झाले. त्याच्या मित्राने पोलिसांना या प्रकाराची माहिती दिली. त्याला उपचारासाठी एम्समध्ये दाखल करण्यात आले. रात्री साडेदहाच्या सुमारास उपचारादरम्यान सक्षमचा मृत्यू झाला. आई अंतकला यांच्या तक्रारीवरून आरोपी बादशाहसह इतर आरोपींविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला व रात्रीच बादशाहला अटक करण्यात आली.