राजेश शेगाेकार
नागपूर : माओवाद्यांशी चकमकीवेळी सुरक्षा जवानांना सुरक्षित बाहेर काढून नक्षल्यांना ठेचण्याचे अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण काैशल्य ‘चक्रव्यूह’ याेजनेद्वारे साधले असून, गेल्या चार वर्षांपासून ते यशस्वी ठरत आहे. परिणामी, सी ६० पथकाची नक्षल्यामंध्ये दहशत असल्याचे मत नक्षलविरोधी अभियानाचे प्रमुख, विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील ‘लाेकमत’शी बाेलताना व्यक्त केले आहे.
या मोहिमेविषयी बोलताना श्री पाटील म्हणाले, की नक्षलविरोधी अभियानाच्या या यशामुळे गडचिरोलीतील सामान्य आदिवासींमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण होत असून, गडचिराेलीत तैनात पाेलिसांचे मनाेबल उंचावले आहे. गेल्या चार वर्षांत जेवढ्या चकमकी झाल्यात त्यामध्ये ‘चक्रव्यूह’ची याेजना महत्त्वाची ठरली. नक्षलवादी काेणत्याही जागी चार तासांहून अधिक वेळ थांबत नाहीत त्यामुळे आम्हाला माहिती मिळताच आम्ही अवघ्या
दाेन तासांत नक्षल्यांना घेरताे व अजिबात जीवितहानी होऊ न देता नक्षल्यांचा खात्मा केला जातो. सर्व अधिकारी, जवान यांच्या एकत्रित टीमवर्कचे हे यश आहे, असेही पाटील म्हणाले.
संधी, वेळ अन् नियाेजन हे ‘चक्रव्यूह’चे यश
नक्षल्यांची खबर मिळताच त्या संधीला आव्हान म्हणून स्वीकारण्याची वृत्ती व चढाईचे नियाेजन, पथकांमधील जवान अन् अधिकाऱ्यांमध्ये समन्वय हे चक्रव्यूहचे यश आहे, असे पाटील म्हणाले.
अवघ्या दाेन तासांत घटनास्थळ गाठल्या जाते, ‘पहिल्या फळीतील जवान नक्षल्यांना हल्ला करण्याची संधीही देत नाहीत. या जवानांच्या पाठीशी दुसरी फळी ‘बॅकॲप’ म्हणून सज्ज असते.
दोन दलमचा खात्मा
१३ मे २०२४ रोजी पेरमिली दलममधील तीन नक्षल्यांना पोलिसांनी ठार केले होते. यामुळे पेरमिली दलम संपुष्टात आले. कोरची-टिपागड, चातगाव- कसनसूर, अहेरी, गट्टा, भामरागड व कंपनी क्र. १० हे सहाच दलम सक्रिय होते. त्यात ८७ सदस्य होते. दि. १७ जुलै रोजीच्या चकमकीत यातील १२ नक्षली ठार झाल्याने दोन्ही दलम संपुष्टात आले असल्याची माहिती पाटील यांनी दिली.