लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशातील दहशतवाद बंदुकीच्या गोळीने संपू शकत नाही. त्यासाठी काश्मीरमधील नागरिकांचा विश्वास जिंकणे आवश्यक आहे, असे मत आम आदमी पार्टीचे प्रदेश संघटक ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी मंगळवारी शिवजयंती महोत्सवात बोलताना व्यक्त केले.हा महोत्सव छत्रपती शिवाजी महाराज जयंती आयोजन समितीच्यावतीने शंकरनगर येथील साई सभागृहात आयोजित करण्यात आला होता. सावंत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तर, राज्याचे माजी महाधिवक्ता अॅड. श्रीहरी अणे, जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे, शिवाजी उद्योजक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विजयकुमार शिंदे, कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भरतिया, अखिल भारतीय कुर्मी क्षेत्रीय महासभेचे राष्ट्रीय महासचिव आर. एस. कनौजिया, विदर्भ राज्य आघाडीचे अध्यक्ष अॅड. नीरज खांदेवाले, जनमंच संस्थेचे अध्यक्ष प्रमोद पांडे, आम आदमी पार्टीचे पूर्व विदर्भ संघटक देवेंद्र वानखेडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.सध्या काश्मीरमधील नागरिकांमध्ये असंतोष आहे. त्यामुळे दहशतवादी अधिक सक्रिय झाले आहेत. येणाऱ्या काळात देशाच्या सुरक्षाविषयक धोरणामध्ये आमूलाग्र बदल होणे गरजेचे आहे. देशाचे संरक्षण मंत्रालय सेनेशी संबंधित व्यक्तीना चांगल्या पद्धतीने सांभाळू शकते. परंतु, सत्तेच्या लालसेपोटी कुणालाही संरक्षण मंत्री केले जाते, असे सावंत यांनी पुढे बोलताना सांगितले. याशिवाय त्यांनी ‘डब्ल्यूटीओ’चा कडाडून विरोध केला व शेतकऱ्यांना झिरो बजेट शेती करण्याचे आवाहन केले.अॅड. अणे यांनी ‘जागतिक आर्थिक धोरण व राजकारणामुळे राज्यघटनेला धोका’ या विषयावर मार्गदर्शन केले. सरकारने केवळ व्यापारी दृष्टिकोन ठेवल्यास देशात अराजकता माजेल. सरकारचे धोरण नेहमी जनतेच्या भल्याचे असले पाहिजे. ‘डब्ल्यूटीओ’च्या धोरणाचा भारतीय नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. देशाची कल्याणकारी राज्य ही संकल्पना धोक्यात आली आहे. सरकारने यासंदर्भात आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे, असे त्यांनी सांगितले.पवार यांनी ‘कृषी क्षेत्राकडे दुर्लक्ष केल्यामुळे अर्थव्यवस्थेवर झालेले परिणाम’ या विषयावर प्रकाश टाकला. शेती व शेतकऱ्यांचे कल्याण केल्याशिवाय देशाचा सर्वांगीण विकास होऊ शकत नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले. विजयकुमार शिंदे यांनी प्रास्ताविक, अरुण वनकर यांनी संचालन तर, रविशंकर मांडवकर यांनी आभार व्यक्त केले.
दहशतवाद बंदुकीच्या गोळीने संपू शकत नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 11:18 PM
देशातील दहशतवाद बंदुकीच्या गोळीने संपू शकत नाही. त्यासाठी काश्मीरमधील नागरिकांचा विश्वास जिंकणे आवश्यक आहे, असे मत आम आदमी पार्टीचे प्रदेश संघटक ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी मंगळवारी शिवजयंती महोत्सवात बोलताना व्यक्त केले.
ठळक मुद्देसुधीर सावंत यांचे मत : काश्मिरी नागरिकांचा विश्वास जिंकणे आवश्यक