लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोट मालिकेचा सिद्धदोष आरोपी अब्दुल गनी इस्माईल तुर्क (वय ६८) याचा मृतदेह मुंबईला नेण्याची तयारी वृत्त लिहिस्तोवर पूर्ण करण्यात आली होती. वृद्धत्व आणि विविध आजाराने ग्रासल्यामुळे गुरुवारी दुपारी गनीचा येथील मेडिकल रुग्णालयात मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूचे वृत्त कळताच गनीचा मुलगा अशरफ अब्दुल गनी तुर्क आणि पुतण्या गुलाम रसूल तुर्क गुरुवारी रात्री ८ वाजता नागपुरात पोहचले. त्यांनी मुंबईला मृतदेह नेण्याची तयारी चालवली होती.१२ मार्च १९९३ ला मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात गनीला अटक करण्यात आली होती. अटक केल्यानंतर तपास यंत्रणांकडे गनीने आरडीएक्स पेरून मुंबईतील सेंच्युरी बाजारात बॉम्बस्फोट घडवून आणल्याची कबुली दिली होती. स्फोट कसे घडवून आणले, कट कुठे आणि कसा रचला, त्याचीही माहिती त्याने तपास यंत्रणेकडे दिली होती. या स्फोटात ११३ लोकांचा मृत्यू झाला होता. गनीचा केवळ याच स्फोटात नव्हे तर मुंबईत ठिकठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटाच्या कटातही सहभाग असल्याचे सांगितले जात होते. पाकिस्तानच्या मदतीने या स्फोटाचे कटकारस्थान रचणारा दाऊद इब्राहिम हा त्यावेळी पळून गेला होता. तर, गनीसोबत नंतर क्रमश: याकूब मेमन आणि अन्य काही जणांनाही पोलिसांनी अटक केली होती. चौकशीनंतर गनीला येरवडा कारागृहात डांबण्यात आले होते. तेथून नोव्हेंबर २०१२ ला त्याला नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात पाठविण्यात आले होते. तेव्हापासून तो नागपूर मध्यवर्ती तुरुंगात शिक्षा भोगत होता. याकूबला या स्फोटाच्या आरोपात नागपूर कारागृहात फाशी देण्यात आली होती. गनीसोबत फाशी तसेच नंतर आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावलेल्या अनेक आरोपींना नागपूरच्या कारागृहात बंदिस्त करण्यात आले होते. गेल्या वर्षीपासून गनीला विविध आजाराने ग्रासले होते. त्याला पॅरालिसिसही झाला होता. त्यामुळे त्याची प्रकृती ढासळतच चालली होती. २२ एप्रिलला त्याला मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथून सुटी मिळाल्यानंतर कारागृहातील रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. गुरुवारी (२५ एप्रिल) दुपारी ११.४० ला त्याची प्रकृती ढासळली. तो बेशुद्ध पडल्यामुळे त्याला पुन्हा मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याच्या मृत्यूचे वृत्त कारागृह प्रशासनाने गृह मंत्रालय, कारागृह तसेच पोलीस प्रशासनातील वरिष्ठांना आणि गनीच्या नातेवाईकांनाही कळविले. त्यानुसार, गनीचा मुलगा अशरफ अब्दुल गनी तुर्क आणि पुतण्या गुलाम रसूल तुर्क गुरुवारी रात्री ८ वाजता नागपुरात पोहचले. आज दुपारी धंतोली पोलिसांनी न्यायदंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मेडिकलमध्ये गनीचे शवविच्छेदन करून घेतले होते.
दहशतवादी गनीचा मृतदेह मुंबईला नेणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 8:34 PM
१९९३ च्या साखळी बॉम्बस्फोट मालिकेचा सिद्धदोष आरोपी अब्दुल गनी इस्माईल तुर्क (वय ६८) याचा मृतदेह मुंबईला नेण्याची तयारी वृत्त लिहिस्तोवर पूर्ण करण्यात आली होती. वृद्धत्व आणि विविध आजाराने ग्रासल्यामुळे गुरुवारी दुपारी गनीचा येथील मेडिकल रुग्णालयात मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूचे वृत्त कळताच गनीचा मुलगा अशरफ अब्दुल गनी तुर्क आणि पुतण्या गुलाम रसूल तुर्क गुरुवारी रात्री ८ वाजता नागपुरात पोहचले. त्यांनी मुंबईला मृतदेह नेण्याची तयारी चालवली होती.
ठळक मुद्देनातेवाईक पोहचले :मेडिकलमध्ये शवविच्छेदन