लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया तसेच झवेरी बाजारात बॉम्बस्फोट घडवून ५२ निरपराधांचे बळी घेणारा दहशतवादी मोहम्मद हनिफ अब्दुल रहीम (वय ५६) याचे शवविच्छेदन करून त्याचा दफनविधी करण्यात आला. यावेळी हनिफचा मुलगा, दोन मुली, जावई आणि मेव्हणा अशी मोजकी मंडळी उपस्थित होती.इलेक्ट्रीकल इंजिनिअर असलेला हनिफ, त्याची पत्नी फहमिदा तसेच त्याच्या अशरत शफिक नामक दहशतवादी साथीदाराने मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया आणि झवेरी बाजारात २५ आॅगस्ट २००३ ला बॉम्बस्फोट घडवून आणले होते. या स्फोटात ५२ निरपराधांचा मृत्यू झाला होता तर, १७४ जण गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर दुबईत पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या मदतीने हनिफने कट रचला आणि हे भयावह बॉम्बस्फोट घडवून आणले होते. त्याबद्दल न्यायालयाने हनिफ, त्याची पत्नी फहमिदा तसेच अशरत शफिक या तिघांना फाशीची शिक्षा सुनावली होती. आॅक्टोबर २०१२ मध्ये फहमिदा आणि हनिफला येथील मध्यवर्ती कारागृहात आणण्यात आले होते. तो मध्यवर्ती कारागृहाच्या फाशी यार्डात बंदिस्त होता. त्याच्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी प्रलंबित असतानाच शनिवारी सायंकाळी त्याची प्रकृती ढासळली. त्यामुळे त्याला मेडिकल इस्पितळात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी हनिफला मृत घोषित केले. याप्रकरणी धंतोली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली तसेच हनिफच्या नातेवाईकांना ती माहिती कळविली. हनिफची दोन मुले रविवारी सायंकाळी नागपुरात पोहोचली. सोमवारी सकाळी त्यांच्याकडून कागदोपत्री औपचारिकता पूर्ण केल्यानंतर हनिफचा मेडिकलमध्ये ठेवलेला मृतदेह दाखविण्यात आला. त्यानंतर दुपारी दंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत इन कॅमेरा हनिफचे शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी पोलीस बंदोबस्त होता.